नाशिक : राज्यात विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election) पुढील दोन ते तीन महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सध्या घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस समोर आली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे काही आमदार फुटल्याचे बोलले जात आहे. त्यात इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांच्याही नावाची चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असतानाच आता त्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. 


काही दिवसांपूर्वीच आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्याच पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला होता. निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तर स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, असे म्हटले होते. तसेच अलीकडच्या काळात हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतल्यामुळे खोसकर काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते.


आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष होणार 


आता विधानसभा निवडणुकीआधीच आमदार हिरामण खोसकर यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. कारण इगतपुरी त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी आता आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष पाहायला मिळणार आहे. इगतपुरीत स्थानिक भूमिपुत्रांच्या आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. 


बाहेरचे पार्सल परत पाठवण्याचा इशारा 


आमदार हिरामण खोसकर हे नाशिक (Nashik News) तालुक्यात वास्तव्यास आहेत. मात्र ते इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे (Igatpuri Assembly Constituency) प्रतिनिधित्व करतात. मात्र आता आयात उमेदवार दिल्यास सर्व ताकदीनिशी पाडून बाहेरचे पार्सल परत पाठवू, असा इशारा स्थानिक भूमिपुत्रांनी दिला आहे. कोणत्याही पक्षाने तिकीट देताना स्थानिक उमेदवारालाच तिकीट देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. 


उमेदवारी मिळवण्यासाठी डोकेदुखी वाढणार


या बैठकीत माजी आमदारांसह इगतपुरी त्रंबकेश्वर मतदार संघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. तर माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांचीही यामुळे अडचण होणार असल्याचे चित्र आहे. 


आणखी वाचा 


Hiraman Khoskar : हिरामण खोसकरांकडून एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, 'मुख्यमंत्री देवमाणूस'