(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : टोळीयुद्ध वाढलं! पूर्ववैमनस्यातून 25 वर्षीय तरुणाला संपवलं, हरसूलजवळची घटना
Nashik Crime : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील हरसूल पोलीस ठाणे (Harsul Police Station) हद्दीत 25 वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना घडली आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारी (Crime) तर वाढलीच आहे, दुसरीकडे जिल्ह्यात देखील गुन्हेगारीने कळस गाठला आहे. आज जिल्ह्यात दोन खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. हरसूल पोलीस ठाण्यात एक तर दुसरी घटना जायखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. त्यामुळे शहराबरोबर आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.
नाशिक शहरात कोरोनानानंतर गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असून रोजच हाणामाऱ्या, खून, दरोडे, प्राणघातक हल्ले होत आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कौटुंबिक वादासह टोळीयुद्धातून खुनाच्या घटना समोर येत आहेत. अशातच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील हरसूल पोलीस ठाणे (Harsul Police Station) हद्दीत खुनाची घटना घडली आहे. त्र्यंबक तालुक्यातील माळेगाव येथे पाच जणांनी मिळून एकाचा खून केल्याची घटना घडली. यात आदित्य श्याम डोकफोडे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी हरसूल पोलिसांनी संशयित सोपान बोबडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यचा खून सोपान व त्याच्या चार साथीदारांनी मिळून मारहाण करीत माळेगाव शिवारात केला. तत्पूर्वी बुधवारी दुपारी 3.30 च्या सुमारास आदित्य डोकफोडे व इतर दोघांनी गिरणारे (Girnare) परिसरात सूरज नंदू बोबडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आदित्यसह तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. आदित्यने भावावर प्राणघातक हल्ला केल्याने सोपान व इतरांनी मिळून माळेगावजवळ लाकडी दांडा व कोयत्याने वार करून आदित्यचा खून केला. दरम्यान, भावावर हल्ला केल्याच्या रागातून सोपान बोबडे व इतर संशयितांनी आदित्यचा पाठलाग करून त्याचा खून केला. या प्रकरणी हरसूल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल असून पोलिसांनी सोपानला अटक केली आहे.
तर दुसरी खुनाची जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे शिवारात हा प्रकार घडला आहे. येथील गुलचंद भिका सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळशीराम बुधा सोनवणे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तुळशीराम सोनवणे यांनी अज्ञात कारणावरून मयत प्रवीण सोनवणे याचा खून केल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी 15 एप्रिल रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर जायखेडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर खून झाल्याचे समोर आले आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही.