![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मोठी बातमी : दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा माकपचा निर्णय, मविआच्या उमेदवाराला पाठींबा
Dindori Lok Sabha Constituency : माकपने दिंडोरीत भाजपचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. माकपकडून भास्कर भगरेंना पाठींबा देण्यात आला आहे.
![मोठी बातमी : दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा माकपचा निर्णय, मविआच्या उमेदवाराला पाठींबा CPIM decision to withdraw J P Gavit s candidature from Dindori Lok Sabha Election and Support to Mahavikas Aghadi candidate Bhaskar Bhagare Maharashtra Politics Marathi News मोठी बातमी : दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा माकपचा निर्णय, मविआच्या उमेदवाराला पाठींबा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/98f92f14b65f5b30ae3e6dd495738f971714910236278923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीतून (Mahayuti) भाजपकडून डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. दिंडोरीतून माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले होते. आता माकपने दिंडोरीत भाजपचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. माकपकडून भास्कर भगरेंना पाठींबा देण्यात आला आहे.
याबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) महाराष्ट्र राज्य कमिटीकडून माध्यमांना माहिती जारी करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. त्यांच्या उमेदवारीचे जनतेने स्वागत केले. जनता आणि देशाच्या हिताशी द्रोह करणाऱ्या, भारताच्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही संघराज्य प्रणालीला आधारभूत असलेले संविधान बदलण्याचे उद्दिष्ट राबवणाऱ्या भाजपचा पराभव करणे, माकपचे स्वतंत्र सामर्थ्य वाढवणे, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करणे, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी माकप पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला.
दिंडोरीची जागा माकपला सोडण्याची केली होती मागणी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची मागणी होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रयत्न करण्यात आले. महाराष्ट्रातील 48 पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षास दिली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत माकपने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते.
जे पी गावित यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय
सत्ताधारी भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवाराविरुद्ध मतदारांमध्ये कमालीचा असंतोष आहे. त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोरीतील उमेदवाराच्या पराभवात होणे अटळ आहे. पण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल. जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भास्कर भगरेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी केले आहे.
जे पी गावित उद्या भूमिका स्पष्ट करणार
दरम्यान, पक्षाच्या राज्य सचिवांनी प्रसिद्धी पत्रक काढत जे पी गावीत यांनी माघार घेऊन शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची केली घोषणा आहे. मात्र दुसरीकडे आम्ही माघार घेतली नसून कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या पत्रकार परिषद घेत पुढील भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी दिली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. आता जे पी गावित नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)