पुणे ड्रग्स प्रकरणावरून भुजबळांचा चंद्रकांतदादांना घरचा आहेर; म्हणाले, विरोधकांनी बोलले तर ठीक, पण...
Chhagan Bhujbal on Chandrakant Patil : मी पालकमंत्री असताना अशा प्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील केले होते. यावरून छगन भुजबळांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
नाशिक : पुण्यातील एफसी रोडवरील (FC Road) नामांकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची (Drugs) नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मी पालकमंत्री असताना अशा प्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत, असे वक्तव्य केले. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी चंद्रकांत पाटील यांना घरचा आहेर दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अमली पदार्थांचा विषय चांगलाच चर्चेत आहे. आता पुण्यातील एका हॉटेलमध्ये तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहोचतात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तर सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावर (Pune Drugs Case) मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली होती.
भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना घरचा आहेर
यावर छगन भुजबळ म्हणाले की, मी पालकमंत्री होतो, मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा असे घडत नव्हते असे म्हणून कसे चालेल? प्रत्येकाच्या कार्यकाळात गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम सुरू असते. काही गोष्टी उजेडात येतात, तेव्हा त्याला महत्व प्राप्त होतं. समोरच्या विरोधकांनी बोलले तर ठीक आहे. पण, बरोबरच्या लोकांनी बोललं तर कसे चालेल, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत की नाही मला आता आठवत नाहीत. तुम्हालाही आठवत नसतील. पण घडल्याच नाही, असा दावा करत येत नाही ना? पुण्याची लोकसंख्या आधी 14 लाख होती. आता 70 लाख झाली. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय, शिक्षण , रुग्णालये चांगली झाल्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
आणखी वाचा