Chandrashekhar Bawankule on Sudhakar Badgujar : मोठी बातमी: सुधाकर बडगुजर यांच्यासाठी भाजपने 24 तासांत दरवाजे उघडले? नाशिकमध्ये बावनकुळेंचं मोठं विधान
Chandrashekhar Bawankule on Sudhakar Badgujar : ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्ते पक्षात नाराज असल्याचा दावा केला. यामुळे नाशिकच्या (Nashik News) राजकारणात मोठी खळबळ उडाली. यानंतर बुधवारी ठाकरे गटाकडून बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्याच दिवशी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा फोन आला आणि त्या फोनवरूनच पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपावरून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी झाली, अशी घोषणा करण्यात आली. यानंतर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांना कोणता पक्ष जवळ करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुधाकर बडगुजर भाजपमध्ये आले तर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची विशेष करून सिडको भागात चांगलीच ताकद वाढेल, असे बोलले जात आहे. तसेच सुधाकर बडगुजर यांच्या रूपाने भाजपला शहरात आणखी एक ओबीसी चेहरा मिळू शकतो. मात्र, सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये घेण्यास स्थानिक नेत्यांनी मोठा विरोध दर्शविला आहे.
पक्ष वाढीसाठी सर्वांना दार खुले: चंद्रशेखर बावनकुळे
यानंतर अवघ्या 24 तासातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठं विधान केलंय. सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत गिरीश महाजन लक्ष घालत आहेत. पक्ष वाढीसाठी सर्वांना दार खुले असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार की दुसर्या पक्षात जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला सीमा हिरेंचा विरोध
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केलाय. सीमा हिरे यांनी म्हटलंय की, बडगुजर भाजपमध्ये प्रवेशासाठी इच्छुक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, आमच्यात यासंदर्भात कोणतीही चर्चा किंवा विचारणा झालेली नाही. मी स्वतः बडगुजर यांच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढवली असून, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आहे. तसेच त्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी त्यांनी चुकीची माहिती पसरवली होती, तर नारायण राणे यांच्यावर त्यांनी अटक होईल अशी परिस्थिती निर्माण केली. त्यामुळे अशा व्यक्तीस पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. बडगुजर यांच्यावर सध्या १७ गुन्हे दाखल असून, त्यांचे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याची माहिती आहे. त्यांच्या मुलावरही एका गोळीबार प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या सर्व प्रकरणांमधून स्वतःची सुटका व्हावी यासाठीच बडगुजर भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करत असावेत, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा























