(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रवादीने दिशा फलक बदलला!
Nashik News : नाशिक राष्ट्रवादीतर्फे शहरातील औरंगाबादरोड येथील दिशा फलक काढून छत्रपती संभाजीनगर असा दिशा फलक लावण्यात आला आहे
Nashik News : औरंगाबाद शहराचे (Aurangabad) नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sabhajinagar) असे नाव देण्यात आले. यास बराच कालावधी उलटला तरी देखील नाशिकमधील (Nashik) रस्त्यावर दिशा फलकाचे नाव बदल न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) वतीने छत्रपती संभाजी नगर रोड असे दिशा फलक लावले.
राज्य शासनाच्या वतीने नुकतंच औरंगाबाद आणि उस्मानाबाद (Osamanabad) या दोन्ही जिल्ह्यांचं नाव बदलण्यात आले आहेत. औरंगाबादचे आता छत्रपती संभाजीनगर नाव बदलण्यात आले तर उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्यात आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik NCP) राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शहरातील औरंगाबाद रोड येथील दिशा फलक काढून छत्रपती संभाजीनगर असा दिशा फलक लावण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती, अखेर ही मागणी मान्य झाली असून या नामांतराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नाशिक मधील औरंगाबाद नाक्यावर छत्रपती संभाजीनगर असे फलक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लावण्यात आले. नामकरण होऊन बराच कालावधी उलटला तरी देखील नाशिकमधील रस्त्यावर दिशा फलकाचे नाव बदलणे झाल्याने राष्ट्रवादीकडून हे फलक लावण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले. शिंदे भाजप सरकारच्या काळात औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबादच धाराशिव असं नामांतर झालं. मात्र, नाशिक शहरात अजूनही औरंगाबाद रोड असे संबोधले जात असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने याची गांभीर्याने दखल घेत नविन आडगाव नाका येथील भागात छत्रपती संभाजीनगर रोड असे दिशा फलक लावले.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांचे नामकरण झाले आहे. मात्र नाशिकमधून औरंगाबादकडे म्हणजेच संभाजीनगरकडे जाणारा जो रस्ता आहे. त्याला अजूनही औरंगाबाद रोड म्हटलं जातं या ठिकाणी असा फलकही आतापर्यंत होता. दरम्यान त्याला सुद्धा छत्रपती संभाजी नगर रोड म्हणावं अशी प्रकारची मागणी राष्ट्रवादी कडून करण्यात येत होती. अशात या रस्त्याचा संभाजीनगर रोड असा उल्लेख व्हावा, शिवाय आराध्य दैवत संभाजी महाराज आहेत त्यांचा या निमित्ताने सन्मान करावा अशी भावना फलक लावण्यामागची असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
अनेक भागात औरंगाबाद रोडचे दिशा फलक
औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजी नगर करण्यात आल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सगळीकडे छत्रपती संभाजी नगर होताना दिसून येत आहे. शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी मात्र अनेक ठिकाणी इतर जिल्ह्यात रोड आणि चौकांना औरंगाबाद नावाचे फलक लावलेले दिसून येत आहेत. नाशिकमध्ये देखील औरंगाबादरोड नावाचे फलक तसेच होते. दरम्यान आता नाशिक मधील औरंगाबाद नाक्यावर छत्रपती संभाजी नगर असा दिशा फलक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लावण्यात आले आहे.