भाजपचे इच्छुक उमेदवार माघारीसाठी शेवटच्या क्षणी पोहोचले, हेमंत गोडसेंची उडाली एकच धावपळ, नेमकं काय घडलं?
Nashik Lok Sabha Constituency : भाजपचे इच्छुक उमेदवार माघारीसाठी शेवटच्या क्षणी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी माघार घेतली आहे. विजय करंजकर यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना (Hemant Godse) जाहीर पाठींबा दिला आहे. तर भाजपचे इच्छुक उमेदवार अनिल जाधव (Anil Jadhav) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अनिल जाधव हे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाल्याने हेमंत गोडसेंची चांगलीच धावपळ उडाल्याचे दिसून आले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) निवडणूक लढवण्यासाठी अनिल जाधव हे भाजपकडून (BJP) इच्छुक होते. नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena) सुटली आणि हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. अनिल जाधव हे नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या शिष्टाईनंतर भाजपचे बंडखोर अनिल जाधव यांची नाशिक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली.
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंची धावपळ
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अनिल जाधव पोहोचले . उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी अवघे काही मिनिटं बाकी असतानाच अनिल जाधव हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने हेमंत गोडसे यांची चांगलीच धावपळ उडाली. अनिल जाधव यांच्यासोबत चक्क महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे धावपळ करत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेल्याचे दिसून आले. याबाबत सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
नाशिकमधून शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतून आपल्याला तिकीट मिळावे, अशी इच्छा शांतीगिरी महाराजांनी व्यक्त होती. मात्र हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर शांतीगिरी महाराजांनी लोकसभेतून माघार घ्यावी यासाठी महायुतीतील नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र निवडणूक लढायची आणि जिंकायची असे म्हणत शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. यामुळे महायुतीच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या