Nashik Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे सहा दिवसात 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान, कांदा पिकाला सर्वाधिक फटका
Nashik Unseasonal Rain : नाशिकमध्ये पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे गेल्या सहा दिवसात झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल एबीपी माझाच्या हाती आला आहे. नाशिकमध्ये 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.
Nashik Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली असून नाशिक (Nashik) जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे गेल्या सहा दिवसात झालेल्या नुकसानीचा (Damage) प्राथमिक अहवाल एबीपी माझाच्या हाती आला आहे. अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. 467 गावातील 36 हजार 442 शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
18 हजार 346 हेक्टवरील कांदा (Onion) भुईसपाट
अवकाळी पावसात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. तब्बल 18 हजार 346 हेक्टवरील कांदा भुईसपाट झाला आहे. शेतात पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडला आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्याखालोखाल, भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष आणि आंबा फळाला फटका बसला आहे. पावसाचा इशारा कायम असल्याने बळीराजासमोरील चिंतेचे ढग कायम आहेत. पंचनामे सध्या सुरु असून प्रत्यक्षात मदत कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
VIDEO : Nashik Onion Loss : नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान ABP Majha
464 हेक्टरवरील आंब्याचे (Mango) नुकसान
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून द्राक्षापाठोपाठ आंबा फळाला मोठा फटका बसला आहे. गेल्या सहा दिवसात जिल्ह्यातील 464 हेक्टर वरील आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे सुरगाणा आणि पेठ तालुक्यात झाडावरुन आंबे अक्षरशः गळून पडल्याचं चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. आंब्याला काळे डाग पडले असून ते पूर्णतः खराब झाले आहेत. या दोन्ही तालुक्यातील केसर आंब्याला गुजरातसह अनेक राज्यातून मोठी मागणी होत असते.
पेठ तालुक्याला गारांच्या (Hail Storm) पावसाने झोडपलं
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने कहर केला असून पेठ तालुक्यात धुमाकूळ घातला. पेठ तालुक्यातील आमलोण, अभेटी, खर्डापाडा, शेवखंडी, अभेटी, घनशेत, कुळवंडी आदी परिसराला गारांच्या पावसाने झोडपून काढलं. साधारण 70 ते 80 हून अधिक घरांची पडझड झाली आहे. अशातच पंचनामे झाले असले तरी अद्याप पेठ तालुक्याचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) मात्र अद्याप नुकसानग्रस्त भागांत आले नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक घरांचे, कुणाच्या पडवीचे, शाळेचे नुकसान झाले आहे. अशावेळी लोकप्रतिनिधीने पाहणी करणे गरजेचे असताना आमदार नरहरी झिरवाळ जपानच्या दौऱ्यावर आहेत.