नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूबाधितांचा आकडा शंभरीपार, एक रुग्ण दगावला
Nashik Dengue Update : नाशकात जानेवारीपासून आतापर्यंत 127 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाला आहे.
नाशिक : शहरात पुन्हा एकदा डेंग्यूने (Dengue) डोके वर काढले असून डेंग्यूबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नाशकात (Nashik News) शंभराहून अधिक डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा डेंग्यूसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मयताच्या रक्ताचे नमूने पुण्यातील (Pune) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर शहरात डासांचा उद्रेक वाढत असताना मनपा (Nashik NMC) प्रशासन शांत असल्याचे दिसून येत आहे. शहरात औषध आणि धूर फवारणी होत नसल्यानं डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे.
आतापर्यंत 127 बाधित, एकाचा मृत्यू
नाशकात जानेवारीपासून आतापर्यंत 127 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर गोविंदनगरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संबंधित मृत रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. डेंग्यूच्या अनुषंगाने गोविंदनगर परिसरातील घरांची ‘डोअर टू डोअर’ तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाने (Health Department) हाती घेतले आहे.
गेल्या वर्षी तब्बल 1 हजार 191 डेंग्यूबाधित
दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होणारा डेंग्यूचा उद्रेक यंदा पावसाळ्याच्या तोंडावरच झाल्याने नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात गेल्या वर्षी तब्बल 1 हजार 191 डेंग्यूबाधित आढळून आले होते. त्यापैकी तीन जणांचा मागील वर्षी बळी गेला होता. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाने तातडीने उपाययोजना करीत धूरफवारणी, जंतूनाशक फवारणी सुरू केल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.
सहा महिन्यांतील रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे
जानेवारी - 22
फेब्रुवारी - 5
मार्च - 27
एप्रिल - 17
मे - 39
जून - 17
एकूण - 127
92 नागरिकांना नोटिसा
नाशिकमध्ये महापालिकेकडून डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वैद्यकीय विभागाअंतर्गत मलेरिया पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन पाणीसाठ्यांची तपासणी केली जात आहे. डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या 92 नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या