Nashik Dengue Update : नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात 365 जणांना डेंग्यूचा डंख, दहा दिवसातील आकडेवारीने चिंता वाढवली
Nashik Dengue Update : जानेवारी 2024 पासून आजपर्यंत तब्बल 365 डेंग्यूचे रुग्ण नाशिकमध्ये आढळले आहेत. तर गेल्या दहा दिवसांची डेंग्यू रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
Nashik Dengue Update नाशिक : शहरात आरोग्य व्यवस्था संपूर्णतः डळमळीत झाल्याचे चित्र आहे. साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाने नाशिककर हैराण झाले आहे. जानेवारी 2024 पासून आजपर्यंत तब्बल 365 डेंग्यूचे (Dengue) रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून नाशिक महापालिकेला (Nashik NMC) डासांची उत्पत्ती स्थळे शोधून तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात जुलै महिन्याच्या दहा दिवसातच 96 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. नाशिक (Nashik) महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डासांची उत्पत्ती स्थळे सर्वाधिक असल्याचं निदर्शनास आले आहे. फ्रिज, झाडांच्या कुंड्या, घरांचे छत हे डासांचे प्रमुख उत्पत्ती स्थळे महापालिकेला मिळून आले आहेत. नागरिकांनी एक दिवस ड्राय डे पाळावा, असे आवाहन नाशिक मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
विभागनिहाय रुग्णांची आकडेवारी
- सातपूर - 2
- सिडको - 38
- नाशिक पूर्व - 15
- नाशिकरोड - 21
- नाशिक पश्चिम - 10
- पंचवटी - 10
डेंग्यूला उत्पत्ती स्थळे आढळल्या प्रकरणी 98 हजारांचा दंड
शहरातील सिडको व नाशिकरोड डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असून, येथे आठवड्याभरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढता धोका पाहता सहाही विभागात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात घरोघरी भेटी दिल्या जाणार असून, घरात व अवतीभोवती डेंग्यू डासांच्या अळ्या व उत्पत्तीसाठी पोषक वातावरण नाही ना, याची तपासणी केली जाणार आहे. संपूर्ण शहरात पंधरा दिवस ही मोहीम राबवली जात आहे. मलेरिया विभागाने बांधकाम प्रकल्प, झोपडपट्टी भाग यांसह विविध ठिकाणी भेटी देत डेंग्यूला उत्पत्ती स्थळे आढळल्या प्रकरणी 98 हजारांचा दंड आकारला आहे.
पंधरा दिवसांची विशेष तपासणी मोहीम
शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी मलेरिया विभागाची बैठक घेत जेथे धूर व औषध फवारणी झाली तेथील नागरिकांना थेट फोन लावत खरंच उपाययोजना राबविल्या जात आहे की नाही, याची पडताळणी केली. तसेच डेंग्यूला अटकाव घालण्यासाठी लवकरच पंधरा दिवसांची विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश त्यांनी दिले.
अतिरिक्त आयुक्तांचा थेट नागरिकांना फोन
पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झाली असताना त्या अगोदरच शहरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. जुलैच्या दहा दिवसांत ९६ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने मनपा मलेरिया विभागाची झोप उडाली. डेंग्यूची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मलेरिया विभागाकडून शहरात औषध व धूर फवारणी केली जात आहे. शहरातील विविध ठिकाणांना भेटी देत डेंग्यूचे हॉटस्पॉट नष्ट केले जात आहे. हे वाढते संकट पाहता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. त्यात शहरात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यावेळी झगडे यांनी उपाययोजना नुसत्या कागदावरच नाही ना, हे तपासण्यासाठी ज्या ठिकाणी धूर व औषध फवारणी करण्यात आली अशा ठिकाणी नागरिकांना फोन करून पडताळणी केली.
आणखी वाचा