Burning Truck : नंदुरबारच्या (Nandurbar) कोंडाईबारी घाटात पुन्हा एकदा चालत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली आहे. मागील महिनाभरात आग लागण्याची चौथी घटना समोर आली आहे. आता नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात चालत्या ट्रकमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे ट्रकच्या चाकाला लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


काही दिवसांपूर्वी कोंडाईबारी घाटातील (Kondaibari Ghat) निमदर्डा फाट्यानजीक महामार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग (Fire) लागली होती. या घटनेतही ट्रकच्या केबिनमध्ये आगीचा भडका उडाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली होती. हा ट्रक गांधीधामहून कर्नाटककडे जात असताना ही घटना घडली होती. या ट्रकमध्ये पावडर भरले होते. ट्रकच्या केबिनमधील आग हवेच्या वेगाने मागेपर्यंत पसरत गेल्याने क्षणातच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला होता. आजच्याही घटनेत ट्रकने क्षणार्धात पेट घेतल्याने चालकाला पळता भुई थोडी झाली. त्याने उडी मारून जीव वाचविला. मात्र ट्रकचा कोळसा झाल्याने मोठे नुकसान झाले. 


दरम्यान हा ट्रक गुजरात राज्यातील वाकाचार रस्ता येथून वाळु (रेती) भरून नाशिकच्या (Nashik) दिशेने जात असताना अचानक आग लागली. मालट्रकचे केबिन लाकडी असल्याने क्षणार्धात संपूर्ण केबिन जळू लागले. विसरवाडी ते कोंडाईबारी घाट या परिसरात महिन्याभरात चौथ्यांदा अग्नि उपद्रवाची घटना घडली असून यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी होत नसली तरी वाहनाचे व वाहनातील साहित्य आगीत जळून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र चौकी किंवा विसरवाडी ग्रामपंचायत यांकडे अग्निशमन बंब उपलब्ध करून दिल्यास महामार्गावरील असे नुकसान टाळता येतील. महामार्गावर आग लागल्याच्या घटनेत वाढ होत असून अग्निशमन बंबाच्या मागणीकडे जिल्हा प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.


निमदर्डा फाट्यावरील 'बर्निंग ट्रक'


काही निमदर्डा फाट्यानजीक शेरटान हाॅटेल जवळ ही घटना घडली होती. चालत्या ट्रकला आग लागल्याने आगीचा भडका उडाला होता. यावेळी आजुबाजुंच्या नागरिकांनी धाव घेत मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आगीचा वेग जास्त असल्याने आग नियंत्रणात न येता संपूर्ण ट्रक जळून  खाक झाला होता. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सदर आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी चालक व सहचालक आग लागताच ट्रकच्या बाहेर निघून गेले.


बंब उपलब्ध करून द्यावा.... 


दरम्यान या मार्गावरून वाहतूक वर्दळीची असते. त्यात ट्रकचा भरणा अधिक असतो. कारण महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा महत्वपूर्ण मार्ग असल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या वाहनांना आग लागल्याचे प्रकार घडतात. मात्र एखाद्या ट्रकला आग लागली तर विझवण्यासाठी जवळपास अग्निशामक बंब नसल्याने विसरवाडी परिसरातील ग्रामस्थांची धावपळ होते. आगीत मोठे नुकसान होते, त्यामुळे विसरवाडी ग्रामपंचायतमध्ये अग्निशामक बंब असणे गरजेचे आहे.