Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्हा गुजरातचा (Gujrat) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्याचा सीमावर्ती भाग म्हणून ओळखला जातो. हा सीमावर्ती भाग दुर्गम असून डोंगराळ या भागात काही ठिकाणी चोरून गांजाची शेती केली जात असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दुर्गम भागावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारा (Drone Camera) नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर नंदुरबार पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 


उत्तर महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्हा असून निसर्गाचे वैभव लाभलेला हा जिल्हा ओळखला जातो. सातपुडाच्या Satpuda) पर्वतरांगानी आणि तापीच्या सानिध्याने समृध्द बनला आहे. सातपुडयाच्या पर्वत रांगामुळे आणि जंगलामुळे नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. इथे बहुसंख्य भागात आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. हा भाग छोट्या छोट्या टेकड्यांनी बनलेला असल्याने दळणवळणाची साधने कमी असल्याने अनेकदा डोंगर भागातील गावांमध्ये जाणे अवघड होऊन बसते. याच सर्व कारणांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. 


दरम्यान या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस सतर्क झाले असून गांजा शेती करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. यासाठी थेट ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार असून तर सपाटी भागात शाळा, महाविद्यालय परिसरात बीट मार्शलच्या माध्यमातून देखरेख केली जाणार आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम सुरू असून पोलिसांना यश येत असल्याचे चित्र आहे. येत्या 26 जून रोजी अमली पदार्थ विरोधी दिन असून या दिवशी जिल्हा अमली पदार्थ मुक्त घोषित केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गेल्या सहा महिन्यात विविध ठिकाणी धाडी टाकून 72 लाखाची आमली पदार्थ जप्त केले आहेत. 


जिल्हा अमली पदार्थ मुक्त करणार 


तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांच्या विशेष पथकाद्वारे लक्ष ठेवले जात असून अमली पदार्थ खरेदी विक्री तसेच जवळ ठेवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ विशेष मोहीम राबवली जात असून गेल्या वर्षभरात केलेल्या जनजागृतीमुळे तसेच पोलीस मुख्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत टोल फ्री नंबरमुळे जिल्ह्यात अमली पदार्थांना आळा घालण्यास यश आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नंदुरबार जिल्हा अमली पदार्थ मुक्त घोषित केला जाणार आहे.