Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात रात्री कुडाच्या झोपडीत झोपलेल्या महिलेला पहाटेच्या सुमारास बिबट्याने घरातून ओढत नेत महिलेचे धड शिरापासून वेगळे करत तिला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटना आता वारंवार समोर येताना दिसून येत असून वनविभागाने यावर उपायोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यातील नयामाळ येथे सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बिबट्याने घरात घुसून महिलेवर केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचे शिरापासून धड वेगळे झाले असून बिबट्याने महिलेला घरातून सुमारे 50 मीटर ओढत नेले असल्याची घटना घडली आहे. 33 वर्षीय सरिता ऊर्फ सरिला वन्या वसावे असे मयत महिलेचे नाव आहे.
ही 33 वर्षीय आपल्या नयामाळ येथील कुडाच्या झोपडीत रात्री झोपली होती. सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास बिबट्याने महिला घरात झोपली असल्याचा अंदाज घेऊन पुढील कुडाचा दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. महिलेला घरातून बाहेर फडफटत नेले. त्यानंतर महिलेने आरडाओरड केली. मात्र, रात्रीच्या किर्र अंधारात घरात काय झाले, याचा कोणालाच अंदाज आला नाही. घडलेला प्रकार लक्षात येईपर्यंत बिबट्याने महिलेला फरफटत नेले होते.
दरम्यान सकाळच्या सुमारास सरिता यांचा मृतदेह घरापासून पूर्वेस सुमारे 50 ते 60 मीटर अंतरावर एका शेताच्या परिसरामध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यात सरिता यांचे डोके धडापासून वेगळे झाले असून डोक्याचा, उजव्या कानाचा भाग पूर्णपणे बिबट्याने नष्ट केला आहे. तर सरिता यांचे शरीरापासून डोके 30 मीटर अंतरावर आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अक्कलकुवा वनक्षेत्रपाल ललित गवळी यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल यांच्यासह पोलिस नाईक अनिल पाडवी, तुकाराम पावरा यांचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी नरशा होण्या वसावे यांच्या खबरीवरून तळोदा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक केदार अधिक तपास करीत आहेत.
बिबट्याची परिसरात दहशत
दरम्यान, या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व अक्कलकुवा या तालुक्यात अति दुर्गम भागात बिबट्याच्या वावर असल्याच्या आणि बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या घटना नेहमीच समोर येत असतात. दुर्गम भागात बिबट्याचे हल्ले जनावर आणि माणसांवर होत असून दुर्दैवी पणे त्यांचा मृत्यू होत असतो. यामुळे स्थानिकांमध्ये दहशततीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वनविभागाने जिल्हा प्रशासनाने अधिकचे लक्ष घालणे, लवकरच यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे बोललेले जात आहे.