Nandurbar News : राज्यात बालमृत्यूसाठी सर्वात अग्रेसर तालुके म्हणून धडगाव (Dhadgaon) आणि अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यांची ओळख आहे. या भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च करुन अत्याधुनिक अशी नवजात शिशु रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली होती. मात्र ही रुग्णवाहिका गेल्या 10 महिन्यांपासून धूळखात पडून असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे परिसरातील विविध शासकीय रुग्णालयांच्या (Govermnet Hospital) सहापैकी पाच ॲम्बुलन्स बंद अवस्थेत असल्याने या भागातील अत्यावश्यक सेवा सलाईनवर असल्याचे समोर आले आहे. 


राज्यात सर्वाधिक कुपोषित बालके, बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या संख्येत नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धडगाव तालुका हा अग्रेसर आहे. त्यामुळे राज्य शासनाने ऑगस्ट 2022 मध्ये धडगाव ग्रामीण रुग्णालयाला पन्नास लाख रुपयांची अत्याधुनिक अशी नवजात शिशु रुग्णवाहिका देखील दिली होती. मात्र गेल्या दहा महिन्यात यातील यंत्रसामुग्रीचे प्रात्यक्षिक न झाल्याने, त्यांच्या साहित्याची जुळवाजुळव न झाल्याने आणि रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडर जोडले गेले नसल्याने ही नवजात शिशु रुग्णवाहिका (Ambulnace) दहा महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. यावरील दोन चालकांच्या नियुक्त्या झाल्या खऱ्या पण या रुग्णवाहिकेवरील डॉक्टरची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे शासनाने पन्नास लाख रुपये खर्च करुन रुग्णवाहिका कशासाठी खरेदी केली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 


नर्मदा बचाव आंदोलनाच्या लतिका राजपूत (Latika Rajput) म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुका हा अति दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. या भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या मोठमोठ्या गप्पा राज्य सरकार आणि प्रशासन करत असतं. मात्र या दोन्ही यंत्रणांच्या अनास्थेने इथल्या आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक भाग हा दुर्गम घाट आणि पहाडी असल्याने सुसज्ज रुग्णवाहिका असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उपचारासाठी आलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले जात असते. मात्र त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन रुग्णवाहिका 2014 पासून चालवल्या जात असून आतापर्यंत त्यांनी सहा लाखांहून अधिक किलोमीटर प्रवास केला आहे. यामुळे सातत्याने त्या रुग्णवाहिकांमध्ये बिघाड होत होत आहेत. अशा रुग्णवाहिकेमधून रुग्णांना ने-आण करणे जीवावर बेतण्यासारखे आहे. 


रुग्ण रेफर होण्याची संख्या अधिक


ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. वानखेडे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणि भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणाहून बाहेरील रुग्णालयात रुग्ण रेफर होण्याची संख्या अधिक आहे. येथील अवघड भौगोलिक परिस्थिती यामुळे सातपुड्याच्या दुर्गम भागात अत्याधुनिक आणि नवीन रुग्णवाहिका राज्य सरकारने उपलब्ध करुन द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे एकीकडे पन्नास लाख रुपये खर्च करुन रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात उभी असताना दुसरी रुग्णवाहिका देण्याची मागणी केली जात आहे.