Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar) आलेल्या वादळाचा (Hurricane) सर्वाधिक फटका केळी बागांना बसला असून काढणीसाठी आलेले केळीचे (Banana Crop) घड खाली पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जमीनदोस्त झालेली केळी खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी असमर्थता दाखवल्यानंतर शेतकऱ्यांनी केळी गुरांना चारा म्हणून टाकली आहेत. एकट्या शहादा तालुक्यात जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने (Rain) हजेरी लावल्याने अनेक भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतो आहे. यामुळे ऐन भरात आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. अशातच काल नाशिकसह (Nashik) पालघर, धुळे, जळगाव आदी भागात पावसाने हजेरी लावली. नंदुरबार जिल्ह्यालाही (Nandurbar District) पावसाने झोडपून काढले. जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आलेल्या वादळाने केली पिकाचे मोठे नुकसान केले आहे. जवळपास शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आहे.
जळगावसह नंदुरबार, धुळे (Dhule) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा अवकाळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशातच आता मान्सूनच्या तोंडावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली आहे. शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून उत्पादित केलेली केळी ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या वादळात उद्धवस्त झाली आहे. वादळ इतके भीषण होते की शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे. तर वादळामुळे पडलेल्या केळीला खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वादळात नुकसान झालेली केळी व्यापारी खरेदी करत नसल्याने शेतकऱ्यांनी ती जनावरांना चारा म्हणून टाकण्यास सुरुवात केली आहे.
पिक जनावरांना टाकण्याची वेळ
पशुपालक दीपक भरवाड म्हणाले कि, अचानक आलेल्या वादळामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे नुकसान झाले असून केळी व्यापारी खरेदी करत नसल्याने शेतकऱ्यांनी आम्हाला बोलावून केळी चाऱ्यासाठी जनावरांना दिली आहे. माझ्याकडे चाळीस ते पन्नास जनावरे असून त्यांचे पाच ते सहा दिवसाच्या चाऱ्याची व्यवस्था झाली आहे. निसर्गाच्या कृपेमुळे बारा महिने राबराब राबवून पिकवलेल्या पिक जनावरांना टाकण्याची वेळ नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आले आहे आता तरी मायबाप सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांना ठोस मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.