Nandurbar News : पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील दुर्गम भागातील 64 गावांमध्ये चार महिन्यांचा धान्यसाठा पोहोचवण्यात आला आहे. प्रशासनाच्या (administration) वतीने दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या  64 गावांमध्ये बारमाही रस्ते झाल्यास  गावांमधील समस्या सुटू शकणार आहेत. चांगले रस्ते नसल्यामुळं नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.


52 हजार 595 नागरिकांना गव्हासह तांदळाचा साठा पोहोचवला


सातपुड्याचा दुर्गम भागात पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांचा धान्यसाठा पोहोचवला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत दोऱ्या खोऱ्यातील दुर्गम अशा 64 गावांमध्ये राहणाऱ्या 52 हजार 595 नागरिकांना 5520 क्विंटल गहू, 16109 क्विंटल तांदूळ पोहोचविण्यात आला आहे.


पावसाळ्यात या भागात वाहने जात नसल्यानं प्रशासनानं घेतली काळजी


महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या सीमेलगत नर्मदा नदीच्या काठावरील उड्या, बादल ,भामने, सावऱ्यादिगर, भाबरी, मनीबेली, धनखेडी चिमलखेडी, डनेल हा भाग अतिदुर्गम आहे. पावसाळ्यात या भागात वाहने जात नसल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळं नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या भागातील नवसंजीवनी अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना औषध साठा आणि धान्यसाठाही उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या गावांमध्ये बारमाही रस्ते झाल्यास गावातील समस्या सुटू शकणार आहेत. उदय नदीवरील पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आणि रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.


बहुतांश गावांमध्ये जाण्यासाठी बोटीचा वापर


पावसाळ्यात येथील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. राज्य शासनाच्या वतीने पावसाळ्याचे चार महिने (जून ते सप्टेंबर) पुरेल एवढे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. या बहुतांश गावामध्ये जाण्यासाठी बोटीने जावे लागते. सरदार सरोवर प्रकल्पातील बाधित अनेक प्रकल्पग्रस्त या भागात वास्तवव्यास आहेत. या गावांना नवसंजीवनी योजनेअंतर्गत जून ते सप्टेंबर महिन्याचे धान्य या गावांना पावसाळ्यापूर्वी धान्य पोहोचविण्यात येवून हे लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.