Nandurbar News: नर्मदा काठावरील तरंगता दवाखाना धोकादायक स्थितीत, प्रतिकूल परिस्थिती कर्मचाऱ्यांची आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी धडपड
जीवघेण्या आणि धोकादायक तरंगत्या दवाखान्यातून तुटपुंज्या सुविधा असताना देखील आरोग्य व्यवस्था आपल्या काम चोख बजावत आहे.
नंदुरबार: सरदार सरोवरच्या निर्मितीनंतर नर्मदा काठावरील दुर्गम भागातील गावांना आरोग्य सुविधा देण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमुळे या भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी तरंगत्या दवाखान्यांची गरज ओळखून युरोपियन कौन्सिलने दोन तरंगते दवाखाने या ठिकाणी दिले. मात्र गेल्या सतरा वर्षात तरंगता दवाखाना धोकादायक झाला आहे. जीवघेण्या आणि धोकादायक तरंगत्या दवाखान्यातून तुटपुंज्या सुविधा असताना देखील आरोग्य व्यवस्था आपल्या काम चोख बजावत आहे. प्रतिकूल परिस्थितीत नर्मदा काठावरील बांधवांना सुविधा पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे.
नर्मदा काठावर अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या अनुशंगाने 2005 मध्ये युरोपीयन कौन्सिलने दोन तरंगते दवाखाने जिल्हातील आरोग्य यंत्रणेला भेट दिले. आता हे तरंगते दवाखाने आता अंतिम घटका मोजत असल्याचे चित्र आहे. गेल्या सतरा वर्षात व्यवस्थित देखभाल दुरुस्ती न झाल्याने तरंगत्या दवाखान्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यातील एक दवाखाना तर 2015 मध्येच बुडाला असून त्याला बाहेर काढण्याची तसदी देखील प्रशासनाने घेतली नाही. तर दुसरीकडे चिमलखेडी येथे असलेल्या तरंगत्या दवाखान्याची अवस्था देखील बिकट झाली आहे. यातील विद्युत व्यवस्था बंद पडल्याने वैद्यकीय पथकाला रात्री अपरात्री रुग्ण आल्यास टॉर्चच्या उजेडात तपासावे लागत आहे. सतरा वर्षात हे दवाखाने कधी पाण्याबाहेर काढून त्याखालचे पत्र सडले की व्यवस्थित आहे हे पाहण्याची तसदी देखील आरोग्य यंत्रणेने घेतलीच नाही.
चिमलखेडी येथे असलेला तरंगता दवाखाना जवळपास परिसरातल्या नऊ खेडे आणि पन्नासहून अधिक पाड्यांसाठी कार्यरत आहे. तरंगत्या दवाखान्यात असलेल्या पथकाने सोमवार ते शनिवारपर्यंत मुक्कामाचे एक वेळापत्रक तयार केले आहे. प्रत्येक गावाच्या काठावर हा तरंगता दवाखाना पोहचून याठिकाणी आरोग्य सेवा पुरवत आहे. मुळातच यातील अनेक गावांना येण्यासाठी रस्ताच नसल्याने हा दवाखानाच आपल्या आरोग्यासाठी सर्व काही असल्याचे नागरिक सांगत आहेत.
माझगाव डॉकच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षा या तरंगत्या दवाखान्याची तपासणी करुन त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही सादर केला. मात्र दुरुस्तीच्या खर्चात नविन अत्याधुनिक अशा बोट येत असल्याने या युरोपीयन कमिशनने दिलेल्या दवाखान्याच्या दुरुस्तीचा विचारही आरोग्य विभागाने सोडून दिला आहे. अशातच या धोकादायक झालेल्या तरंगत्या दवाखान्याचा वापर करुन आरोग्य यंत्रणा मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणार का असाच काहीसा प्रश्न निर्माण होत आहे. शासन स्तरावरुच याबाबत ठोस निर्णय घेऊन नवीन बोट रुग्णवाहिकेद्वारे या भागातील आरोग्यसेवा अधिक बळकटीची गरज व्यक्त होत आहे.