Sanjay Biyani: कोणतीही पूर्वसूचना न देता संजय बियाणी यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढली, कुटुंबीय भयभीत
Sanjay Biyani Murder Case: उद्योजक संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात आली होती. आता ती काढून घेण्यात आली आहे.
नांदेड: उद्योजक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला देण्यात आलेली सुरक्षा आता काढून घेण्यात आली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलिसांनी बियाणी यांच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा काढून घेतल्याने हे कुटुंबीय भयभीत झालं आहे. त्यांना देण्यात आलेली सुरक्षा का काढून घेतली यावर बोलण्यास पोलीस प्रशासनाने मात्र नकार दिला आहे.
प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची 5 एप्रिल 2022 रोजी दिवसाढवळ्या त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या घटनेस आज 10 महिने लोटले असून आतापर्यंत 15 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हत्येतील शार्प शूटर दीपक रांगा यास NIA ने ताब्यात घेतले आहे. मात्र आज पोलिसांनी कोणतीही कल्पना न देता बियाणी कुटुंबाचे पोलीस संरक्षण काढून घेतल्याचा आरोप संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी केला.
तर अचानक काढून घेतलेल्या या पोलीस संरक्षणामुळे संपूर्ण बियाणी कुटुंबीय भयभीत झाले आहे. दरम्यान त्यांची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेता आपणास पुन्हा पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी विनंती बियाणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान याविषयी बोलण्यास पोलीस प्रशासनाने मात्र नकार दिला आहे.
नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची खंडणीच्या कारणावरुन हरविंदर सिंह रिंदा याच्या साथीदाराने गोळ्या घालून हत्या केली होती. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तर दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, व्यापारी यांनी स्थलांतराची तयारी केली होती.
या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने बियाणी हत्येच्या कटात सहभागी असलेल्या 15 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. परंतु बियाणींवर गोळीबार करणारे दोन शूटर फरार होते. महिन्यापूर्वी गुजरातमधून एका शूटर अटक करण्यात आली होती. मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणात तो सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. तर मुख्य शूटर असलेला दीपक सुरेश रांगा हा यंत्रणांना गुंगारा देत होता.
नेपाळ बॉर्डरवरुन केली अटक
संजय बियाणी यांच्यावर हरविंदर सिंह रिंदा याच्या सांगण्यावरुन गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार करणाऱ्या दोन शूटरपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर दुसरा महत्वाचा शूटर दीपक सुरेश रांगा फरार झाला होता. त्याच्या शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. मात्र अनेक राज्यात शोध घेऊन दीपक पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र बुधवारी (25 जानेवारी) एनआयएच्या पथकाने नेपाळ बॉर्डरवरुन त्याला अटक केली आहे. त्यामुळे आता नांदेड पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात, तसेच त्याच्या अटकेमुळे बियाणी यांच्या हत्येसह इतर घटनांतील अनेक बाबी समोर येणार आहेत.