(Source: Poll of Polls)
Nanded : मरणानंतरही संपेनात माणसाच्या यातना... सेलगाच्या ग्रामस्थांचा मृतदेहावर अंत्यसंकार करण्यासाठी गुडघाभर पाण्यातून प्रवास
Nanded Rain : नांदेड शहरापासून 5 किमी अंतरावरील सेलगांव येथील ग्रामस्थांना मृत झालेल्यांचा अत्यंसंस्कार करण्यासाठी गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे
नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना आणि मन्याड नद्यांना पूर आलाय. नांदेड शहरापासून 5 किमी अंतरावरील सेलगांव येथील ग्रामस्थांना मृत झालेल्यांचा अत्यंसंस्कार करण्यासाठी गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागत आहे
नांदेड शहरापासून पाच किमी अंतरावरील सेलगांव येथील अंत्ययात्रेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सेलगाव येथील कमलबाई मारोतराव राजेगोरे यांचे काल दीर्घ आजाराने निधन झाले. दरम्यान दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मागील 48 तासात दोन वेळा सेलगांवचा शहराशी असणारा संपर्क तुटला आहे. तर काल रात्रीपासून गावा लगतच्या पुलावरून 5 ते 6 फुट पाण्याचा प्रवाह वाहत आहे .त्यामुळे सेलगांवची स्मशानभूमी पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे.
एकीकडे देश स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असतानाच आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. दुसरीकडे नांदेडमध्ये अंत्यसंस्कार करावे कुठे? या विवंचनेत ग्रामस्थ होते. कमलाबाई यांच्या कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत करून शेलगांव ते पिंपळगांव रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. एव्हाना हा रस्तासुद्धा नदीकिनारी असल्यामुळे अंत्ययात्रा अशी गुडघाभर पाण्यातून काढावी लागली .त्यामुळे अंत्यविधीसाठी जवळच्या पाहुण्यांना, नातेवाईकांना देखील पुरामुळे अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही.
दरवर्षी पावसाळ्यात अशी पूरपरिस्थितीत निर्माण होऊन असा जीवघेणा प्रवास नित्याचाच झालाय.जोपर्यंत सेलगाववासीयांना पर्यायी रस्ता उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हा प्रश्न असाच कायमस्वरूपी भेडसावत राहणार आहे. त्यामुळे मायबाप प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सेलगांवच्या या प्रश्नाकडे गांभार्याने घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून सेलगावकरांना अचानक उद्भवलेल्या आजारात रुग्णांना हॉस्पीटलपर्यंत घेऊन जाता येईल व त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील. ज्यामुळे अत्यावस्थ रुग्णांना अशा पूरपरिस्थितीत घरीच तडफडून गतप्राण होण्याची वेळ येणार नाही.
आजही ग्रामीण भागात अनेक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. या सोयी सुविधेकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळं नागरिकांना आता मरणानंतरही हाल भोगावे लागत आहेत. गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कंबरेभर पाण्यातून नदी ओलांडून स्मशानभूमीकडे अंत्यविधीसाठी प्रेतयात्रा न्यावी लागत आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेतयात्रा नेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणे हे दूरच राहिले आहे.