Nanded News: गेल्या आठवड्याभरापासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असतांना कोणतेही नेतेमंडळी त्या काळात नागरिकांच्या मदतीला धावून न आल्याने शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर हे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अंतापुरकर यांना गावकऱ्यांनी चक्क धारेवर धरल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
याबाबत अधिक माहिती अशी की, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास आमदार जितेश अंतापुरकर हे देगलूर तालुक्यातील एका गावात पोहचले. त्यावेळी गावकऱ्यांनी अंतापुरकर यांना घेराव घालून गावातील समस्यांचा पाढा त्यांच्या समोर वाचला. एवढेच नाही तर गावातील रोहित्रसंदर्भात फोन केला असता अंतापुरकर यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला. तर आम्ही संकटाचा सामना करत असतांना तुम्हांला आज आमची आठवण आली का असा प्रश्न ही गावकऱ्यांनी उपस्थित केला. नागरिकांचा हा संताप पाहता आमदारांनी तेथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, एबीपी माझाने याची खात्री केलेली नाही.
पुन्हा पावसाची हजेरी
तब्बल दहा दिवस जिल्हाभरात धोधो कोसळत पाणीच पाणी करून सगळ्यांची दाणादाण उडवल्यानंतर वरूण राजाने जिल्ह्यात दिवस विश्रांती घेतली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील राहिलेली कामे उरकण्यास सवड मिळाली होती. दरम्यान तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल सायंकाळपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. तर संध्याकाळपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप सुरूच आहे. ज्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाली असून, सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
महत्वाच्या बातम्या...
Marathwada Dam: मराठवाड्यातील प्रमुख अकरा धरणात 65 टक्के पाणीसाठा
Marathwada Rain Update: मराठवाडा विभागातील जवळपास 3 लाख 38 हजार 88 हेक्टरचे नुकसान झाले आहे.