Nanded Rains : नांदेड जिल्ह्यात पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी अनेक गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अशातच हदगाव तालुक्यातील करोडी येथील नवरदेवाने नियोजित लग्नविधीला पोहोचण्यासाठी अति धाडस दाखवले. कारण आज होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी आणि बोहल्यावर चढण्यासाठी नवरदेव थेट नदीच्या महापुरातून प्रवास करुन मांडवात पोहोचला. तर वऱ्हाडी मंडळीही आपला जीव मुठीत घेऊन पुरातून प्रवास करुन लग्न सोहळ्यात पोहोचले आहेत. सांगायचे झाले तर ही घटना उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथील आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील करोडी येथील नवरदेव आज होणाऱ्या लग्न सोहळ्यासाठी आणि तत्पूर्वी टिळा आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी थर्माकॉलची होडी करुन पैनगंगा नदीच्या महापुरातून सासुरवाडीत पोहोचला.


दरम्यान करोडी ता. हदगाव येथील शहाजी माधव राकडे हा आठवी शिकलेला तरुण आहे. आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. बहिणींची लग्न झाली आहेत. घरी शेती वगैरे काही नाही. मोलमजुरी करुन तो आपला आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवतो. त्याचा विवाह नात्यातीलच संगम चिंचोली ता. उमरखेड येथील गायत्री बालाजी गोंडाडे या मुलीशी एक महिन्यापूर्वी जुळून आला होता.


ठरल्या प्रमाणे 14 जुलै रोजी गुरुवारी वधूकडे लग्नाआधी होणारे टिळा, कुंकू, पानवाट्याचा आणि रात्री हळदीचा कार्यक्रम होते. सततच्या पावसामुळे सर्वत्र पूर परस्थिती असताना पैनगंगा आणि कयाधू नदी संगम स्थान असणाऱ्या संगमचिंचोली येथे पूर परिस्थितीमुळे नवरदेव घोड्यावरून येण्याऐवजी थेट होडीवरुन मांडवात दाखल झाला. 


थर्माकॉलच्या होडीतून नदीमार्गे सात किमी अंतर कापलं
अतिवृष्टीमुळे पैनगंगा व कयाधु या नद्या सध्या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहेत. त्यामुळे या दोन नदीच्या संगमावर वसलेल्या चिंचोली या गावाचा शहराशी असणारा संपर्क तुटला असून गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. असे असताना ठरल्याप्रमाणे नियोजित वेळी टिळा, कुंकू पानवाट्याच्या कार्यक्रमात पोहोचायचं कसं असा प्रश्न होता. त्यावेळी वराकडील वऱ्हाडी मंडळी, वर शहाजी राकडेसह नातेवाईक थर्माकॉलच्या होडीतून नदी मार्गे सात किमी अंतर कापत संगम चिंचोली लग्न सोहळ्यास पोहोचले आहेत. पावसाने उघडीप दिली तर वऱ्हाडी आणि नवरी वाहनाने सासरी पोहोचतील. रात्रीतून पाऊस उघडला नाही तर पुन्हा नदी मार्गे वऱ्हाडींना आणि नवरी-नवरदेवाला प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान लग्न सोहळ्यासाठी महापूरातून थर्माकॉलच्या होडीने प्रवास करतानाचा नवरदेवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.