Nagpur News Update : एका 23 वर्षीय तरुणीची पेट्रोल टाकून जाळून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपुरात सुराबर्डी जवळील म्हाडा क्वार्टर समोरील मैदानात ही घटना घडली आहे.  


मृत तरूणी  काल संध्याकाळपासून बेपत्ता होती. तिच्या आईने प्रतापनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. आज संध्याकाळी या मुलीचे जळालेले प्रेत वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सुराबर्डी परिसरात एका मैदानात आढळून आले आहे. 
 
ही तरूणी नागपुरातील खामला परिसरात एका खासगी कंपनीत काम करत होती. काल कार्यालयात गेल्यानंतर ती संध्याकाळी घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईने प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. पोलीस तिचा शोध घेत असताना आज संध्याकाळी सुराबर्डी परिसरात रिकाम्या म्हाडा क्वार्टर समोरील मैदानात तिचे जळालेले प्रेत एका गावकऱ्याला दिसून आले.  त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. 


मृत तरूणी काम करत असलेली कंपनी आणि तिचे जळालेले प्रेत सापडला सुराबर्डी परिसर बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे तिला त्या ठिकाणी कोणी नेले? याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी तिच्या एका मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. 


दरम्यान, गेल्या दोन वर्षापूर्वी अशीच एक घटना हिंगणघाट येथे घडली होती. 3 फेब्रुवारी 2020 रोजी हिंगणघाट येथे विकेश नगराळे या तरूणाने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. उपचारादरम्यान 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या विकेशला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. परंतु, या प्रकरणी नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या