कल्याण : कल्याण पूर्वेतील चाळ कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीमध्ये चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मुलांना हल्ला करण्यासाठी 10 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. चाळीतले घर बनवण्यासाठी देण्यात येणाऱ्या कोटेशनवरुन एका कॉन्ट्रॅक्टरने दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरची सुपारी दिली होती. या घटनेच्या निमित्ताने चाळीतील घरे दुरुस्त करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरमध्येही जीवघेणी स्पर्धा असल्याचे दिसून आलं आहे. 


कल्याण पूर्वेतील खडगोळवली परिसरात राहणारे बिपीन मिश्रा हे चाळ कॉन्ट्रॅक्टर असून चाळीतील घरे दुरुस्तीचे काम करतात. खडेगोळवलीतील एका पान सेंटरसमोर 14 मार्च रोजी कॉन्ट्रॅक्टर बिपिन मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात बिपिन मिश्रा जबर जखमी झाले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाला. 


कोणत्याही प्रकारचा सुगावा नसताना पोलिसांनी तपास करत या प्रकारणार चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान अल्पवयीन मुलांकडून झालेला खुलासा धक्कादायक होता. सोनू उर्फ नाककट्या नावाच्या व्यक्तीने बिपीन मिश्रावर हल्ला करण्यासाठी दहा हजार रुपये दिले होते. पोलिसांनी सोनू उर्फ नाककट्याला ताब्यात घेतलं. सोनूला पोलीस खाक्या दाखवताच त्याने प्रमोद चव्हाण याने आपल्याला 25 हजार रुपये दिल्याचं सांगितलं. कोलशेवाडी पोलिसांनी प्रमोद चव्हाण याला ताब्यात घेतलं. 


प्रमोद चव्हाण हा देखील चाळ कॉन्ट्रॅक्टर आहे. प्रमोद आणि बिपीन यांच्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. बिपीन मिश्राचा काटा काढण्यासाठी प्रमोद चव्हाणने त्याची सुपारी दिली. तर सोनूने फक्त दहा हजार रुपये देत या हल्ल्यासाठी लहान मुलांचा वापर केला होता. 


संबंधित बातम्या