Beed Local News Updates : नोकरीसोबतच लग्न लावून देण्याच्या अमिषापोटी चक्क हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात धर्मांतर केल्याची घटना परळी तालुक्यातील मांडवा या छोट्या गावी उघड झाली आहे.  ज्ञानेश्वर नागरगोजे या 35 वर्षीय तरुणाने 11 फेब्रुवारी रोजी बाँडवर घोषणापत्र लिहून दिले. त्यात आपण मुस्लिम धर्माचा अभ्यास केला, असून यापुढे मुस्लिम धर्माचा अभ्यास करण्यासाठी याबरोबरच आत्मचिंतन करून इस्लामची शिकवण खऱ्या अर्थाने प्रभावशाली असल्याचे सांगत इस्लाम धर्म स्वीकारत असल्याचे बॉण्डवर लिहून दिले. यासोबतच प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे चरित्र विश्वबंधुत्व याचा अभ्यास करताना मी पाईक झालो व स्वखुशीने स्वयंप्रेरणेने भारतीय राज्य घटनेच्या कलम 25 नुसार धर्मस्वातंत्र्याचा अधिकार वापरून मी मुस्लीम धर्मात प्रवेश करत आहे. माझे नाव यापुढे मोहमद शहजाद मनोहर असे बदललेले असल्याचा बॉण्ड वर लिहून दिले.


सहा दिवसानंतर म्हणजे 17 तारखेला ज्ञानेश्वर नागरगोजे यांनी परत दुसरा बॉण्ड बनवला. ज्यात त्याने नोटरी करून शपथपत्रावर दावा केला आहे की 11 फेब्रुवारी 2020 रोजी माझी मानसिक स्थिती ठीक नसल्याचा गैरफायदा घेऊन परळी व बीड येथील समाजकंटकांनी तुला अडचणीतून सोडवतो पैसे देतो व मुस्लिम मुलीसोबत लग्न लावतो असे आमिष दाखवून घोषणा पत्र लिहून घेतल्याचे ज्ञानेश्वर नागरगोजे यांचे म्हणणे आहे.  यात मला मुस्लिम धर्माची तत्व मान्य नाहीत. माझे मोहमद शहजाद मनोहर असे नावही मी बदललेले नाही. त्यासोबतच मी मुस्लिम धर्माचा कधीही अभ्यास केलेला नाही, आणि माझ्या नावाचे मी कुठेही गॅझेट प्रसिद्ध केलेले नाही, असा दावा ज्ञानेश्वर नागरगोजे याने दुसऱ्या बॉण्डमध्ये केलाय.


ज्ञानेश्वरला फसवून सह्या घेतल्या - तुकाराम नागरगोजे


ज्ञानेश्वर नागरगोजेचा भाऊ तुकाराम नागरगोजे यांनी ज्ञानेश्वरला कामासाठी काही लोक बाहेर घेऊन गेले. तिथे तुला नोकरी देतो, पैसे देतो, यासोबतच काम देतो म्हणून त्याच्या बॉण्डवर सह्या करून घेतल्या. मात्र तो बॉण्ड वाचल्यानंतर ज्ञानेश्वरने आम्हाला सांगितले. पुन्हा आम्ही तो नवीन बॉण्ड तयार करून घेतला. या सदरामध्ये आम्हाला कोणाचीही तक्रार करायची नाही, पण आमच्या कुटुंबाला यातून त्रास होणार नाही आणि आमच्या गावाची बातमी होणार नाही, अशी विनंती सुद्धा या वेळी ज्ञानेश्वर नागरगोजे यांचा भाऊ तुकाराम नागरगोजे यांनी केली आहे.


दरम्यान, ज्ञानेश्वर नागरगोजे याचे यापूर्वी एक लग्न झाले होते. मात्र त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे, मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर हा मानसिक तणावाखाली असतो असं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.