नागपूर : बंदी असून ही सर्रास विकला जाणारा नायलॉन मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. गेल्या वर्षभरात नागपूरमध्ये मांजामुळे दुर्घटना होण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. परंतु, मांजा विक्री बंद झाली नाहीच. नागपूमध्येच पुन्हा एक दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे जखमी झाला आहे. गळ्यात नायलॉन मांजा अडकल्यामुळे प्राध्यापकाचा जीव जाता-जाता वाचला. डॉ. राजेश क्षीरसागर असे जखमी झालेल्या प्राध्यपकांचे नाव आहे. जखमी झाल्यानंतर डॉ. क्षीरसागर यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


डॉ. राजेश क्षीरसागर हे आपल्या दुचाकीवरून उड्डाणपुलावर जात असताना त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. यात क्षीरसागर यांच्या गळ्याला आणि उजव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.


डॉ. क्षीरसागर हे कामानिमित्त कळमेश्ववरून परत येत असताना उड्डाण पुलावर गळ्याला काहीतरी अडकल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी तत्काळ गाडी थांबवली. गाडी थांबवण्यापूर्वी त्यांनी गळ्यावर असलेला नायलॉन मांजा हाताने बाजूला केला. परंतु, मांजाने त्यांच्या उजव्या हाताचे मधले बोट आणि अंगठा कापला. क्षीरसागर यांच्या गळ्यावरही मांजामुळे दुखापत झाली आहे.   


या घटनेनंतर क्षीरसागर यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. "हा अपघात नसून हा जीवघेणा हल्ला आहे, यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.


लोकांनी पतंगबाजीचा आनंद घेताना इतरांच्या जीवावर अशा पद्धतीने हल्ला करू नये. महानगरपालिका आणि पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या तसेच त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणीही प्राध्यापक क्षीरसागर यांनी केली आहे. 


दरवर्षी नागपुरात नायलॉन मांजामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होतात. तर गेल्या वर्षी दोन तरुणांचा मृत्यू या नायलॉन मांजामुळे झाला होता.


महत्वाच्या बातम्या