नागपूर : शहरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळं गळा कापल्या गेल्यामुळं 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज एका तरुणाचा जीव या मांजाने घेतला आहे. रामबाग परिसरात भररस्त्यावर एका तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरुन मृत्यू झाला आहे. प्रणय उर्फ अभिषेक असे मृत 20 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.


प्रणय आज सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घाट रोडवरील सरदार पटेल चौकाकडून मेडिकल कॉलेजच्या दिशेने जात असताना रामबाग वस्तीजवळ त्याच्या दुचाकीसमोर नायलॉन मांजा आला. मांजा अॅक्टीव्हा वर बसलेल्या प्रणयच्या गळ्याजवळ आला असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही मुलांनी तो खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रणय याच्या गळ्यावरचा शिरा चिरल्या गेल्या आणि प्रचंड रक्तस्त्राव होऊन तो तिथेच कोसळला. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने प्रणयचा जागीच मृत्यू झाला.


नायलॉन मांजामुळे नागपुरात 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी


पोलिसांनी घटनास्थळी येऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून कापलेल्या पतंगीचा मांजा खेचणारी मुले कोण होती याचा शोध सुरु केला. मात्र, त्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. नागपुरात दरवर्षी संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. दरवर्षीच अनेक दुचाकीस्वार नायलॉन मांजामुळे जखमी होतात. आता तर एका तरुणाचा बळी गेला आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका नायलॉन मांजा विक्री आणि रस्त्याच्या कडेला उभे राहून होणाऱ्या धोकादायक पतंगबाजी वर केव्हा आळा बसवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.


यापूर्वी नागपुरात 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी
आदित्य 30 डिसेंबरला सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मानकापूर परिसरातील गोधनी मार्गावरून बाईकनं त्याच्या कॉम्प्युटर क्लासला जात होता. तेव्हा त्याच्या बाइकसमोर अचानक हवेतून नॉयलॉन मांजा आडवा आला. त्यामुळं आदित्यचा गळा नॉयलॉन मांजामुळं कापला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत आदित्य दुचाकीवरून खाली कोसळला आणि बरेच लांब फरफटत गेला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला उपचाराकरीता जवळील स्पर्श हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्याची स्थिती जास्त गंभीर असल्याने त्याला एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.


Nylon Manja accident in Nagpur | नायलॉन मांजामुळे नागपुरात 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी