Nagpur News : नागपूरकर लय भारी आहेत, सर्वच लोक खूप चांगले असून त्यांनी खूप मदत केली. हा चित्रपट नागपूरच्या लोकांवर आधारीत असून हा नागपुरात शूट झाला आहे. त्यामुळे नागपुरात येऊन मला आनंद झाला असल्याचं झुंडचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) म्हणाले. ते काल (रविवारी) प्रीमियर शोसाठी नागपूरात आले होते. यावेळी प्रीमियरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हजेरी लावत चित्रपटाचं कौतुक केलं. सदर परिसरारील स्मृती चित्रपटगृहात प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागराज मंजुळे आणि टीमचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. 


नागपुरात काल (रविवारी) झुंड चित्रपटाचा प्रीमियर शो ठेवण्यात आला होता. यासाठी झुंडचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांच्यासह टीमचे कलाकार यावेळी उपस्थित झाले होते. जल्लोषात टीमची खुल्या वाहनातून मिरवणूक काढताना ढोलताशा वाजवत स्वागत करत त्यांना चित्रपट गृहापर्यंत आणण्यात आलं. सदर परिसरातील बुटी चित्रपट गृहात या प्रीमियर शोचे आयोजन केलं होतं. यावेळी प्रीमियरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हजेरी लावली होती. 


नागपुरातील ते कलाकार नसते तर ती मजा आली नसती : नागराज मंजुळे 


नागपूरची भाषा, त्यांची बोली, चला वागणूक, बोलण्याचा लय सगळे पाहता ते कलाकार नागपुरातील नसते तर चित्रपटात ती मजा आली नसती. त्यामुळे यासाठी नागपूरचे कलाकार घेतले असल्याचेही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं. 


नागराजजींच्या गुणवत्तेला मी प्रमाणपत्र द्यायची गरज नाही : नितीन गडकरी


नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. आउट ऑफ बॉक्स विचार करून सुंदर चित्रपटाच निर्मिती केली आहे. झोपडपट्टीतील लोकांना घेऊन ही फिल्म नक्कीच आवडेल. कलाकारांना प्रोत्साहन मिळाल्यानं तेही ही नाव कमावतील. नागराज मंजुळे यांनी स्वतःच्या कामला सिद्ध केले आहे. त्यामुळे त्याचा गुणवतेला माझा प्रमाणपत्राची गरज नाही, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha