Flying Bus In Nagpur: पुणेकरांना आज मेट्रोची भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन केले. यापाठोपाठ आता नागपूरकरांनाही मोठी भेट मिळणार आहे. नागपूरात लवकरच आपल्याला जमिनीवर नाही, तर हवेत बस धावताना दिसणार आहे. रस्ते निर्मितीमुळं रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरात हवेतून चालणारी केबल बस सुरू करण्याचा सूतोवाच केला आहे.  


दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेबाबत मागणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपूरात ही हवेतून धावणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर केले. यासाठी गडकरी यांनी आराखडा तयार करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 35 ते 40 सीटर ही केबल बस सध्या फिलिपिन्समध्ये चालवली जात असून त्याच धर्तीवर नागपूरात ही केबल बस सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले आहेत. नागपूरातील ही केबल बस पारडीहून रिंगरोड मार्गे लंडन स्ट्रीटपर्यंत जाईल. तेथून हिंगणा टी पॉईंट, डिफेन्सवाडी येथून व्हेरायटी चौकापर्यंत पर्यंत जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.


उत्तर प्रदेशात ही हवेत धावणार बस


नागपूरात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर करण्याआधी उत्तर प्रदेशातही गडकरींनी हवेत उडणारी बस धावणार असल्याची घोषणा केली होती. एका प्रचार सभेतील संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले होते की, ''प्रयागराजमध्ये हवाई उड्डाण करणारी बस धावणार आहे. त्याचा आराखडा तयार केला जात आहे. दिल्लीहून प्रयागराजला सी-प्लेनमध्ये बसून येथील त्रिवेणी संगमावर उतरण्याची आपली इच्छा आहे, ही इच्छाही पूर्ण होणार आहे.'' 2024 मध्ये उत्तर प्रदेशमधील नागरिकांना हवेत धावणारी ही बस दिसणार असल्याचे ते म्हणाले होते. 


संबधित बातमी:  उत्तर प्रदेशात बस उडणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण चर्चेत


महत्वाच्या बातम्या