शरीर संबंध ठेवताना गळफास लागून तरुणाचा मृत्यू, गर्लफ्रेण्डला बेड्या
शारीरिक संबंध ठेवताना कुछ नया करण्याच्या नादात गळफास लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 7 जानेवारीला नागपुरात घडली होता. आता या प्रकरणी पोलिसांनी त्या तरुणाच्या प्रेयसीला अटक केली आहे.

नागपूर : नागपुरात हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवताना गळफास लागून तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. तरुणाच्या मृत्यूच्या वेळी रुममध्ये असणाऱ्या प्रेयसीला आरोपी बनवत तिला अटक करण्यात आली आहे. तरुणाच्या वडिलांनी मुलाची हत्या झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
काय आहे प्रकरण? नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात महाराजा लॉजमध्ये 7 जानेवारीला संध्याकाळी ही घटना घडली. 27 वर्षीय मृत तरुण इंजिनिअर होता. मृत तरुण आणि त्याची 22 वर्षीय मैत्रीण या दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेम संबंध आहे. काल दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजमध्ये गेले आणि एक खोली बुक केली. तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये शाररिक संबंध झाले. यावेळी कुछ नया करण्याच्या नादात तरुणाने काही तरी वेगळा करण्याचा प्रस्ताव दिला, तरुणीने तो मान्य केला.
दोरीचा उपयोग करत तरुणीने खुर्चीवर तरुणाचे हात आणि पाय दोरीने बांधले पुढे तीच दोरी त्याच्या गळ्याच्या भोवती सुद्धा गुंडाळली. थोड्या वेळाने तरुणी स्वच्छतागृहात गेली. मात्र, खुर्चीवर दोरीने बांधलेला तरुण तसाच होता. काही वेळाने तो खुर्चीसह खाली कोसळला, दुर्दैवाने त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि त्याला गळफास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणी स्वच्छतागृहातून बाहेर येईपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता.
तरुणीने लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना दिली. त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी तपासणी केली असता बांधलेल्या दोरीने गळा आवळला गेल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
आपल्या मुलाची हत्या असल्याचं सांगत आता तरुणाच्या वडिलांनी नागपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन मृत तरुणाच्या प्रेयसीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून यात आणखी काय पुढे येते हे पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
