Nagpur News : शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांचे आवाहन
सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा, वसतीगृह व दिव्यांग शाळेतील 28 शिक्षक, मुख्याध्यापक व गृहपालांचा अतिरिक्त विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नागपूर: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षक मुख्य भूमिका बजावत असून व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे. नवनवीन प्रयोग, प्रात्यक्षिके, अभिनव कल्पनांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांचे जीवन घडवित असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान, ज्ञानरचनावाद पध्दतीचा वापर करुन आनंददायी, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, असे प्रतिपादन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे केले. शिक्षक दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उत्कृष्ट मुख्याध्यापक, शिक्षक व गृहपाल यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
विद्यार्थ्यांना बालपणी शिकविलेल्या अनेक चांगल्या शैक्षणिक गोष्टी व सवयी त्यांच्या आयुष्यात निरंतर स्मरणात राहतात. प्राथमिक शाळेत शिकविलेले गणिताचे पाढे व शुध्दलेखणाची सवय ही आयुष्यभर कायम राहते. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या निवासी शाळा, वसतीगृहात शिकणारी मुले ही मागासवर्गीय व सफाई कामगार, वंचित घटकांतून आलेली असतात. शिक्षकांनी त्या मुलांमध्ये समाजाच्या मुख्य प्रवाहात टिकण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करावा. निवासी शाळेतील मुलांना आपली मुले समजून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. दुर्गम व ग्रामीण क्षेत्रातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी स्थानिक बोलीभाषेचा आपल्या अध्यापनात वापर करावा. मुलांना साध्या व सोप्या भाषेत शैक्षणिक अभ्यासक्रम समजावून सांगावे, असे डॉ. खोडे-चवरे यांनी सांगितले.
सत्कार म्हणजे केलेल्या कामाची पावती
या सोहळ्यात उत्कृष्ट मुख्याध्यापक, शिक्षक गृहपाल म्हणून सत्कार होणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन डॉ. खोडे-चवरे यांनी केले. सत्कार म्हणजे तुम्ही केलेल्या कामाची पावती आहे. परंतु, इतरांनीही स्वत:ला कमी न समजता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतून पुढच्या वर्षी हा पुरस्कार मिळविणारच, अशी स्वत:शी खुणगाठ बांधावी. विभागाच्या अधिनस्त येणाऱ्या सर्व शाळांमधून गुणवंत विद्यार्थी निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षकांनी प्रयोगशील व्हावेः कुंभेजकर
कुंभेजकर म्हणाले, सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या निवासी शाळा, वसतिगृहात शिकणारा विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेला असतो. त्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्याच्या शिक्षकाची असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षणाविषयीची भिती घालवून त्याला सहज सोप्या भाषेत विषयांचे ज्ञान करुन द्यावे. सामाजिक न्याय विभागाव्दारे उत्कृष्ठ शिक्षकांचा प्रथमत:च गौरव होत असल्याचे पाहून आनंद होत आहे. शिक्षकांनी नवनवीन प्रयोग, अभिनव संकल्पनांचा शिक्षण पध्दतीत वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवावे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करण्यासाठी शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण द्यावे. याच विद्यार्थ्यांमधून जे विद्यार्थी भविष्यात सनदी अधिकारी बनतील तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा सत्कार झाला असे समजावे, असेही त्यांनी सांगितले.
नवीन संकल्पनेतून कार्यक्रम
समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या अभिनव संकल्पनेतून समाजकल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय निवासी शाळा, वसतीगृहे, दिव्यांग शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व गृहपालांचा गौरव करण्याचे सुचविले, असे गायकवाड यांनी सांगितले. विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या निवासी शाळा, वसतीगृह, दिव्यांग शाळा, विद्यार्थ्यांची क्षमता, संगणक कक्ष तसेच शाळेतील इतर सोयी-सुविधा, उत्कृष्ट शिक्षक यासंदर्भात प्रास्ताविकातून माहिती दिली. सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा, वसतीगृह व दिव्यांग शाळेतील 28 शिक्षक, मुख्याध्यापक व गृहपाल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विभागातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, गृहपाल अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, अनुसूचित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त सुरेंद्र पवार, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, प्रसाद कुळकर्णी, सुकेशिनी तेलगोटे, विनोद मोहतुरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, पुष्पलता अत्राम आदी यावेळी उपस्थित होते.
या शिक्षकांचा सत्कार
मुख्याध्यापक - स्नेहर शंभरकर (नागपूर), संध्या दहीवले (गोंदिया), रमेश अजमिरे (वर्धा), लक्ष्मी दांडेकर (वर्धा), नरेंद्र मेंढे (भंडारा), बबीता हुमने (चंद्रपूर), एन.एस. कोडापे, गणेश दुधे (गडचिरोली)
सहाय्यक शिक्षक- प्रियंका डांगेवार (नागपूर), अविनाश मालोदे (चंद्रपूर), कृणाली धकाते (भंडारा), एम. पी. बनकर, प्रविण जंगले, निशांत नडे (वर्धा), सारीका राऊत (भंडारा), किशोर अंबुले, प्रिती घरडे, संदीपकुमार बगमारे (गोंदिया), एस.एम. बोरवार, पी.ए. लांजेवार, एम.एम. श्रीरंगे (गडचिरोली)
कला शिक्षक - उमेश वारजुरकर, अलोक व्दिवेदी, संतोष हिरणवार
गृहपाल- योगराज सावरबांधे (गोंदिया), सुधीर मेश्राम (नागपूर), अजय बोरकर (चंद्रपूर), शुभांगी जिवने आदींचा समावेश आहे.
इतर बातम्या