(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News: रामटेकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ; राज्यातील पहिलाच उपक्रम
Nagpur News: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यातील पहिला पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला आज शुक्रवार, 19 जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे.
नागपूर: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यातील पहिला पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला आज (19 जानेवारी) रोजी सुरुवात झाली. या निमित्याने रामटेक(Ramtek) येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर भवनाचे तसेच स्वर्गीय डॉ. कमलाकर तोतडे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात आले. हे सभागृह रामटेकच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल, असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी बोलतांना व्यक्त केला.
रामटेकचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा
रामटेकचा इतिहास लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रभूश्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. कालिदासांचा सहवास या परिसराला लाभला आहे. भविष्यात हा इतिहास नवीन पिढीपर्यंत आधुनिक माध्यमातून पोहोचेल, असा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. रामटेकच्या गडासाठी रोप-वे मंजूर झाला असून लवकरच त्याचे भूमिपूजन होणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
डॉ. कमलाकर तोतडे यांचे रामटेकशी ऋणानुबंध होते. त्यांचे वडीलही दानशूर होते. त्यामुळे पंचक्रोशीत तोतडे कुटुंबाचा लौकिक होता. डॉक्टरांनी सरकारी सेवा सोडून जनतेची सेवा केली. सेवा आणि उपचाराला प्राधान्य दिले. प्रसंगी अनेक रुग्णांकडून पैसेही घेतले नाहीत. त्यांना लोकांनीच ‘देवदूत’ उपाधी दिली होती. त्यांच्या नावाने हे सभागृह व्हावे, अशी माझी इच्छा होती. मी स्वतः या सभागृहाच्या कामात विशेष लक्ष दिले. या सभागृहाचा फायदा येथील होतकरू कलावंतांना होईल, याचा मला विश्वास असल्याचे देखील नितीन गडकरी म्हणाले.
राज्यातील पहिला पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्यातील पहिला पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाला आज शुक्रवार, 19 जानेवारी रोजी सुरुवात झाली. या महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पद्मश्री हेमा मालिनी यांची रामायण नृत्य नाटिका सादर होणार आहे. 19 ते 23 जानेवारीदरम्यान महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना मेजवानी मिळणार असून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांचा सहभाग राहणार आहे. शनिवार, 20 जानेवारीला सुरांचे बादशाह पद्मश्री सुरेश वाडेकर यांचे गीतगायन होणार असून, रविवार, 21 जानेवारीला विख्यात गायक हंसराज रघुवंशी यांचा भक्तिगीत कार्यक्रम होणार आहे. तर सोमवार, 22 जानेवारीला रामटेकवरील सिंधुरागिरी महानाट्य, मंगळवार, 23 जानेवारीला प्रख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची स्वरसंध्या हा कार्यक्रम होणार आहे
सकाळच्या सत्रात कवी कालिदासांवर प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महाखिचडीचे प्रात्यक्षिक, लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा, फोटोग्राफी, पेंटिंग स्पर्धा, स्केटिंटा स्पर्धा, एरोमॉडेलिंग शो, फूड फेस्टिव्हल आदींचे आयोजन करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा: