Nagpur News : कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज एकदिवसीय लाक्षणिक संप; विदर्भातील बाजारपेठा बंद
Nagpur News : राज्यासह विदर्भातील सर्व बाजार समित्यांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या अनुषंगाने नागपूरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा बंद राहणार आहे.
Nagpur News : राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bazar Samiti) धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात निवडणुका न घेता कायमस्वरुपी प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी आज, 26 फेब्रुवारीला राज्यातील सर्व बाजार समित्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. या अनुषंगाने नागपूरातील (Nagpur News)कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा बंद असल्याचे चित्र आहे. यामुळे दिवसाला होणारी कोट्यावधींची उलाढाल आज ठप्प राहणार आहे.
एक दिवसाचा लाक्षणिक संप
राज्याच्या पणन कायद्यात बदल करू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने राज्यातील विविध ठिकाणच्या बाजार समितीच्या आवारात आज, सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक संप केला जाणार आहे. असा निर्णय राज्यातील बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर उद्या, राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंदची हाक दिली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी काही बाजारपेठा आणि जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून या संपाची माहिती देत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. यात एक दिवस राज्यातील बाजार समितीचे सर्व प्रकारच्या शेती मालाचे लिलाव बंद ठेवून या लाक्षणिक संपाला पाठिंबा द्यावा, असे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आज सोमवारी राज्यभरातील बहुतांश बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय शनिवारीच घेण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्याचे सभापती, उपसभापती आणि सचिवांची बैठक पुण्यात पार पडली. त्यात बंदचा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध
राज्य सरकारने प्रशासकांच्या हाती बाजार समित्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे. त्याअनुशंगाने पुण्यात काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाची बैठक पार पडली. त्यात या निर्णयाला विरोध म्हणून येत्या उद्या राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी बंदची हाक दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, कोठारी, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही, वरोरा, भद्रावती, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, सावली येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. या सगळ्याच बाजार समित्या आज 26 फेब्रुवारी रोजी बंद राहणार. आहेत. कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील प्रस्तावित बदल होऊ नये, 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 अन्वये सुरू असलेले बदल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने केली असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय बंद पुकारला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या