(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari : एक वेळ जीव देईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही; नितीन गडकरींनी सांगितली जुनी आठवण
Nitin Gadkari : विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नाही, असं वक्तव्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय.
नागपूर : विहिरीत उडी घेऊन जीव देईन, पण कधीच काँग्रेसमध्ये जाणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलंय. नागपुरात उद्योजकांच्या एका समिटला काल संबोधित करताना नितीन गडकरी यांनी एक जुना किस्सा सांगितला. यावेळी त्यांनी आपण कधीच काँग्रेसमध्ये जाणार नाही असे स्पष्ट केले.
"विद्यार्थी दशेत असताना काँग्रेस पक्षाचे नेते आणि मित्र असलेल्या श्रीकांत जिचकार यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. तेव्हा त्यांना विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही, कारण मला काँग्रेस पक्षाची विचारधारा आवडत नाही असे स्पष्ट नकार दिल्याची आठवण गडकरींनी सांगितली.
यावेळी उद्योजकांना संबोधित करताना गडकरींनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही कानमंत्र ही दिले. प्रत्येकाने व्यवसाय करताना ह्युमन रिलेशनशिप जोपासली पाहिजे. कुणाचे वाईट दिवस असो किंवा चांगले दिवस असो. एकदा कोणाचा हात धरला की त्याची साथ सोडू नका, उगवत्या सूर्याची पूजा करू नका असे ही गडकरी म्हणाले. युज एंड थ्रो पॉलिसी चांगली नाही असा सल्ला देखील गडकरी यांनी यावेळी युवा उद्योजकांना दिला.
भाजपच्या संसदीय मंडळातून काढून टाकल्यानंतर नितीन गडकरी चर्चेत आहेत. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार काय अशी चर्चा होती. परंतु, गडकरी यांच्या या वक्तव्याने आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. परतु, एकीकडे काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी नितीन गडकरी यांनी येथील युवा उद्योजकांना दिलेल्या सल्याची मात्र आता चर्चा होत आहे. कारण या सल्ल्यातून त्यांनी भाजपला एक प्रकारे इशारा दिलाय का असे बोलले जात आहे. "कुणाचे वाईट दिवस असो किंवा चांगले दिवस असो. एकदा कोणाचा हात धरला की त्याची साथ सोडू नका, उगवत्या सूर्याची पूजा करू नका असे सांगत युज एंड थ्रो पॉलिसी चांगली नाही असा सल्ला देखील गडकरी यांनी या समिटला उपस्थित असलेल्या युवा उद्योजकांना दिला आहे. या सल्ल्यातूनच त्यांनी आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या