व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चॅटिंगच्या वादातून ग्रुप सदस्यावर जीवघेणा हल्ला, नागपूरमधील घटना
महापालिका परिसरात घडलेल्या या घटनेत सुनिल अबिचंदानी यांनी कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला. आपल्याला अजूनही जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं ते सांगतात.
![व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चॅटिंगच्या वादातून ग्रुप सदस्यावर जीवघेणा हल्ला, नागपूरमधील घटना Fatal attack on group member over WhatsApp chatting dispute in Nagpur व्हॉट्सअॅप ग्रुपमधील चॅटिंगच्या वादातून ग्रुप सदस्यावर जीवघेणा हल्ला, नागपूरमधील घटना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/22020338/crime-scene-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एका सदस्याला ग्रुप अॅडमिनने काढून टाकल्यानंतर त्यासंदर्भात ग्रुपच्या दुसऱ्या सदस्यानं कमेंट टाकल्याच्या रागातून कमेंट टाकणाऱ्या सदस्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. सुनिल अबिचंदानी असं या हल्ल्यात जखमी झालेल्या व्हॉट्सअप ग्रुप सदस्याचं नाव आहे. ग्रुपमधून काढून टाकण्यात आलेल्या चंद्रमणी यादव आणि त्यांचा नातेवाईक छत्रपती यादव यांनी लोखंडी हत्याराने हल्ला करत गंभीर जखमी केले. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
सुनिल अबिचंदानी नागपूर महापालिकेचे कंत्राटदार असून त्यांच्यावर चंद्रमणी यादव व छत्रपती यादव यांनी लोखंडी छन्नीने जीवघेणा हल्ला केलाय. सुनिल अबिचंदानी यांच्या सोबतच चंद्रमणी यादव हे देखील मनपामध्ये कंत्राटदार आहेत. दोघेही 'मनपा ठेकेदार संघर्ष' या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सदस्य आहेत. या ग्रुपमधील एका अॅडमिननं चंद्रमणी यादवला काही कारणाने ग्रुपमधून काढून टाकले. त्यावर सुनिल अंबिचंदानी यांनी कमेंट केली होती. या कमेंटवरून चंद्रमणी यादव यांना संताप आल्याने त्यांनं सुनील अबिचंदानी यांना याबाबत बोलण्यासाठी फोन करून महापालिकेच्या कार्यलयाजवळ बोलावलं. तिथे चंद्रमणी आणि छत्रपती यादवनं सुनिल यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. त्यांच्यावर छन्नीने प्राणघातक हल्ला केला.
महापालिका परिसरात घडलेल्या या घटनेत सुनिल अबिचंदानी यांनी कसाबसा आपला जीव वाचवत तिथून पळ काढला. आपल्याला अजूनही जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं ते सांगतात. 'मनपा ठेकेदार संघर्ष' ग्रुपमधून बाहेर काढण्यापूर्वी अजून एका व्यावसायिक ग्रुपमधून यादवला काढण्यात आलं होतं. दोन्ही व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्यानंतर सुनिल यांनी केलेल्या कमेंटचा राग मनात ठेवून चंद्रमणी यादवनं हा हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे...
व्ह़ॉट्सअॅपवर अनेकांचे वाद होत असतात. ग्रुपमध्ये शाब्दिक चकमकही होते. मात्र, व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या व त्यासंबंधी कमेंटवरून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. नागपूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या
'ओन्ली भाईगिरी, रावण साम्राज्य' नावाचे भयंकर ग्रुप्स, नागपुरात व्हॉट्सअॅपवरील कमेंटमुळे हत्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)