नागपूर : जिल्ह्यात क्वारंटाईन केलेल्या कुटुंबाच्या घरात पुन्हा चोरीची घटना घडली आहे. त्यामुळे नागपुरातील चोरटे आता क्वॉरंटाईन केलेल्या कुटुंबाच्या घरांना टार्गेट करत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. जून महिन्याच्या 7 तारखेला नाईक तलाव परिसरात आणि जुलै महिन्याच्या 21 तारखेला जरीपटका परिसरातील कुशीनगरमध्ये क्वॉरंटाईन केलेल्या कुटुंबियांच्या घरात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. त्याशिवाय अंबाझरी आणि मानकापूर परिसरात ही अशाच घटना घडल्या होत्या.


पुन्हा एकदा क्वॉरंटाईन केलेल्या कुटुंबाच्या घराला चोरट्यांकडून टार्गेट करण्यात आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये रविदास नगरमधील एका क्वॉरंटाईन केलेल्या कुटुंबाच्या घरी मोठी चोरी झाली आहे. चोरट्यानी त्यांच्या घरातून तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने आणि 4 किलो चांदी चोरून नेली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, कामठी मधील रविदास नगरमध्ये राहणाऱ्या रेल्वेच्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या कुटुंबाचे काही सदस्य कोरोना बाधित आढळल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना 20 जुलै रोजी इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यात आले होते. तर त्यांच्या घराच्या परिसराला कंटेन्मेंट झोन जाहीर करत परिसर सील करण्यात आला होता. तिथे पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आला होता.


25 जुलै रोजी हे सेवानिवृत्त अधिकारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे क्वॉरंटाईन सेन्टरमधून घरी परतले तेव्हा घरात मोठी चोरी झाल्याचे आढळले. चोरट्यांनी घरातील कपाटांमधून सोन्याचे दागिने, चांदी आणि इतर किमती ऐवज चोरून नेला होता. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करत तपास सुरु केला आहे.


चोरीच्या अशा घटनांमुळे नागपुरातील चोरटे आता क्वॉरंटाईन केलेल्या कुटुंबाच्या घराना टार्गेट करत असल्याचे समोर आले आहे. शिवाय कंटेन्मेंट झोनमध्ये पोलीस बंदोबस्त असताना होणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागपुरात गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे, हे देखील स्पष्ट होत आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


पोलिसाच्या घरी चोरी, तक्रारीनंतर पोलिस म्हणतात, 'ते' घर सॅनिटाईझ नसल्यानं तपासाला जाणार नाही!


नागपूरच्या विलगीकरण केंद्रात प्रेमीयुगुलाचं पती-पत्नी म्हणून वास्तव्य, खऱ्या पत्नीमुळे प्रकार उघड


नागपुरात दारूविक्रेत्याला महिलांनी धू-धू धुतले, पोलिसांचे अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष