नागपूर : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरकरांना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला असला तरी नागपुरात महाविकास आघाडीतील काही नेत्यांना मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य शंभर टक्के पटलेले नाही. काहींनी मुख्यमंत्र्यांना या विषयी नाण्याची एकच बाजू माहीत असून आम्ही त्यांना नाण्याची दुसरी बाजूही लक्षात आणून देऊ असे म्हटले आहे. तर काहींना मुंढे आधी अनेक जनहिताच्या कामांना सरळ नाही म्हणायचे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्याबद्दल नाराज असायचे, आता मात्र मुंढे यांची कार्यपद्धती हळू हळू बदलत असून लोकप्रतिनिधींची त्यांच्या बद्दलची नाराजी दूर होत असल्याचे वाटत आहे. त्यामुळे मुंढे यांना मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यानं तरी नागपुरात सुरु असलेले राजकारण लवकर संपण्याची चिन्हे नाहीत.


तुकाराम मुंढेंबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे शिस्तप्रिय अधिकारी असून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले होते.  नागपूर महापालिकेतील तुकाराम मुंढे विरुद्ध नगरसेवक हे वाद अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मुंढे यांनी लोकहिताचे निर्णय घेतले असून शहरातील नागरिकांना त्यांनी शिस्त लावण्याचे प्रयत्न प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नागपूरकरांनी तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी राहिले पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर नागपुरात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये मुंढे यांच्याबद्दल वेगवेगळे सूर उमटल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा- सरकार तीन चाकी असलं तरी स्टिअरिंग माझ्याच हाती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात अनेक वेळा तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त करत आंदोलनात्मक भूमिका ही स्वीकारली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर आमदार ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते असून आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत. मात्र, कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नागपूरबद्दल नाण्याची एकच बाजू माहित असेल. त्यामुळे त्यांना भेटून आम्ही नाण्याची दुसरी बाजूही सांगू आणि यात नागपूरच्या जनतेचे आणि लोकप्रतिनिधींचे कुठे चुकले हे ही विचारू असे सूचक वक्तव्य केले आहे. जनतेची भूमिका समजून घेणे हे अधिकाऱ्यांचे काम असते. अधिकाऱ्यांनी तसे केले तरच जनता अधिकाऱ्याच्या पाठीशी उभी राहू शकते असे ही विकास ठाकरे म्हणाले. नागपूर शहरात लोकप्रतिनिधी म्हणून माझा तीन दशकांचा अनुभव आहे. ते ही अधिकारी ( तुकाराम मुंढे ) ऐकून घेणार नसेल तर आम्ही त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी कसे उभे राहणार असा प्रश्न विकास ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटकाळात ही मुंबई सांभाळून दाखविली आहे. त्यामुळे ते मुंढे यांना नागपूर कसं सांभाळावं याबद्दल नक्कीच समज देतील अशी आमची अपेक्षा ही विकास ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.


दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि महापालिकेत पक्षाचे गट नेते दुनेश्वर पेठे हे जरी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशी सहमत आहे. मात्र तरी मुंढे यांच्या सुरुवातीच्या दिवसातल्या कार्यशैलीबद्दल काही महत्वाचे प्रश्न निर्माण करताना दुनेश्वर पेठे भविष्यात मुंढे फक्त नागपूरकरांच्या हिताला प्राधान्य देतील अशी अपेक्षा ही व्यक्त करतायेत. जेव्हा तुकाराम मुंढे बजेट मधून जनतेच्या आवश्यक कामांसाठीही निधी देत नव्हते. तेव्हा त्यांच्यात आणि नगरसेवकांमध्ये नक्कीच दुरावा निर्माण झाला होता आणि म्हणूनच मुंढेंबद्दल नाराजी ही होती. मात्र आता मुंढे यांच्या कार्यशैलीत सकारात्मक बदल होतंय. त्यामुळे आम्ही नक्कीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्याप्रमाणे तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी राहू. फक्त अपेक्षा एवढीच आहे की आता तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांच्या हिताचे काम करावे असे दूनेश्वर पेठे म्हणाले.

तर महापालिकेतील विरोधी पक्ष नेते  आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नगरसेवक तानाजी वनवे यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीत आता सकारात्मक बदल दिसून येत आहेत. ते प्रशासन आणि शासन दोघांना सोबत घेऊन कामे करत आहेत. हा जणू चमत्कारच झाला आहे असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी उभे राहू असे तानाजी वनवे म्हणाले.

नागपूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपचे बहुमत ही मोठे आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवर आयुक्त तुकाराम मुंढे यांना भाजप नगरसेवकांचा कडवा विरोध असताना मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यानंतर ही महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांमध्ये तुकाराम मुंढे यांच्याबद्दल अजून ही किंतु परंतु असणे नागपुरात तुकाराम मुंढे याना नावाभोवती केंद्रित झालेले वाद लवकर संपण्याची चिन्हे नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तुकाराम मुंढे फोन उचलत नाहीत, भेटायला गेल्यास बाहेर उभं ठेवतात अशा देखील तक्रारी त्यांच्या संदर्भात झाल्या होत्या. महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात पत्र पाठवून केली होती.

सबंधित बातम्या

'मी लॉकडाऊन उघडतो, लोकं मृत्यूमुखी पडली तर जबाबदारी घ्याल का?' : मुख्यमंत्री ठाकरे 

... म्हणून मी मंत्रालयात जात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे