मात्र, त्यानंतर ही गावात अवैध दारू विक्री काही थांबली नाही. उलट महिलांनी बैठक घेऊन ही पोलीस दारूवाल्यांविरोधात कारवाई करत नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे मनोबल वाढले होते. पोलीस काहीच करत नाही हे लक्षात आल्यावर महिलांनी स्वतः गावाच्या वेशीवर निगराणी ठेवणे सुरू केले होते. काल संध्याकाळी ललित नावाचा दारू विक्रेता महिलांना दिसला. गावाच्या वेशीवर महिलांनी त्याला अडवले. त्याच्याकडील प्लास्टिकच्या डबक्याची पाहणी केली असता त्यात देशी दारू आढळली. त्यानंतर प्रचंड संतापलेल्या महिलांनी चक्क दुर्गेचा अवतार धारण करत या दारू विक्रेत्याला चांगलीच अद्दल घडविली. काही महिलांनी तर या दारू विक्रेत्याला चपलेने चांगलेच बदडले. घाबरलेला दारू विक्रेता महिलांची माफी मागू लागला. पुढे असे करणार नाही असे सांगून सोडून देण्याची विनवणी करू लागला. महिलांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र तरीही त्याच्या विरोधात पोलिसांनी अद्यापपर्यंत ठोस कारवाई केलेली नाही.
ग्रामीण भागात अवैध दारूचा महिलांना प्रचंड त्रास असतो. म्हणूनच आग्रा गावासारखीच अवैध दारूच्या विक्रीवर लगाम लावण्याची मागणी अनेक गावात होत असते. मात्र, जेव्हा कायदाची अंमलबजावणी करणारे पोलीस त्यांचे काम नीट करत नाही. तेव्हा महिलांना अशाच पद्धतीने कायद्याची मर्यादा ओलांडून स्वतःच दारू विक्रेत्यांना अद्दल घडवावी लागते. आणि नागपूर जिल्ह्यातील आग्रा गावात नेमके तेच घडले आहे.
विशेष म्हणजे ज्या आग्रा गावात ही घटना घडली ते आग्रा गाव गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघातील गाव आहे. त्यामुळे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही असा गृहमंत्र्यांच्या इशारा त्यांच्याच मतदारसंघात पोलिसांनी गांभीर्याने घेतला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.