नागपूर : नागपुरात सामान्य नागरिकांच्या घरी चोरी हे नवीन प्रकार नाही. मात्र, कोरोना काळात जर एखाद्या घरी चोरी झाली तर त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागू शकते. असाच कटू अनुभव नागपूरच्या कुशीनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाला आला आहे. आधीच कोरोनाच्या संक्रमणाने ग्रासलेल्या या कुटुंबाला महापालिकेचा ढिसाळपणा आणि पोलिसांची असंवदेनशीलता सहन करावी लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका आणि पोलीस यांच्यात फुटबॉल झालेले हे कुटुंब एका पोलीस कर्मचाऱ्याचे आहे. त्यामुळे अशा स्थितीत अडकलेल्या सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी.


नागपूरच्या कुशीनगर परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबात एक सदस्य 12 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर नियमाप्रमाणे त्याच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचं घर तर कुलूपबंद होतं. तर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे आणि त्याच्या कुटुंबातील इतर सर्व सदस्य संशयित रुग्ण श्रेणीत आल्यामुळे त्यांच्या घराच्या अवतीभवतीचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर झाले होते.

त्यामुळे त्या परिसरातून बाहेर निघणाऱ्या सर्व रस्त्यांवर चोख पोलीस बंदोबस्त ही लावण्यात आला होता. पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातून कोरोना पॉझिटिव्ह निघालेला एकमेव सदस्य 21 जुलैच्या रात्री रुग्णालयातून कोरोना मुक्त होऊन घरी पोहोचला. तोवर त्याच्या कुटुंबातले इतर सदस्य क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर पडले नव्हते. आणि दरम्यानच्या काळात त्यांच्या घरी चोरट्यांनी चोरी करत पावणे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. कंटेन्मेंट झोनच्या आत झालेल्या चोरीची तक्रार जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये केली. तेव्हा सुरुवातीला पोलीस ही अचंबित झाले. मात्र, थोड्या वेळानंतर पोलिसांनी संबंधित घरी तपासासाठी जाण्यास नकार दिला.



पोलिसांचा तर्क होता की कुशीनगर मधील ज्या कोरोना बाधितांच्या घरी चोरी झाली आहे. ते घर महापालिकेने 12 जुलैपासून आजवर सॅनिटाईझ केलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी तपासासाठी त्या घरात प्रवेश करणे धोकादायक आहे असा पोलिसांचा तर्क होता. त्यामुळे जोवर ते घर सॅनिटाईझ होत नाही तोवर त्या घरात प्रवेश करण्यास नकार दिला. अखेर चोरीमुळे मोठा आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबाने महापालिकेला विनंती करून घर सॅनिटाईझ करून घेतले.

कदाचे कोरोना बाधिताचे घर सॅनिटाईझ झाल्यानंतर पोलिसांनी त्या घरात प्रवेश करत तपासाला सुरुवात केली. मात्र, त्या कुटुंबाच्या अडचणींचा अंत इथेच झाला नाही. तर घर सॅनिटाईझ केल्यामुळे घरातून चोरट्यांचे फिंगर प्रिंट्स / बोटांचे ठसे नाहीसे झाले आहे. त्यामुळे आता चोरांचा शोध लावणे आणखी कठीण होऊन बसल्याचे उत्तर पोलिसांनी दिले. त्यामुळे आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या त्या कुटुंबाला आधी महापालिकेच्या हलगर्जीपणाचा आणि आणि नंतर पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे संबंधित कुटुंब नागपूर ग्रामीण पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचे असून सुद्धा त्यांना एवढ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा स्थितीत अडकलेल्या सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच न केलेली बरी.