भाजप अध्यक्ष अमित शाह 30 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरेंना भेटणार का? याकडे सर्वांच लक्ष
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 30 तारखेला मुंबई दौऱ्यावर आहेत. भाजपच्या आमदारांच्या कार्यक्रमासाठी अमित शाह मुंबईत येणार आहेत. मात्र या दरम्यान ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 30 तारखेला मुंबईत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी ही माहिती दिली आहे. नागपुरात भाजप कार्यालयात दिवाळीच्या पूजेनंतर ते बोलत होते. नागपुरातील धंतोली परिसरातील भाजपच्या विभागीय कार्यालयात स्थानिक नेत्यांचे दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दिवाळी मिलन कार्यक्रमात नागपुरातील वरिष्ठ भाजप पदाधिकारी आणि सर्व आजी माजी आमदार ही उपस्थित होते.
अमित शहा मुंबई दौऱ्यावर असताना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का? या प्रश्नावर गिरीश व्यास यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. अमित शाह याआधीही मातोश्रीवर गेले आहेत, पुढेही जातील. त्यात गैर काय किंवा बिघडलं काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि राज्याच्या निवडणुकात महायुतीला मिळालेल्या विजयाचे अभिनंदन करायला ते मातोश्रीवर जातील अशी शक्यता त्यांनी वर्तविली.
दरम्यान, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन होईल, असा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळे शिवसेनेची अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजप मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र भाजपला गेल्या विधानसभेपेक्षा यंदा 17 जागा कमी मिळाल्या आहेत. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे भाजपला शक्य नाही. त्यामुळे हीच वेळ साधत शिवसेनेने भाजपला युतीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देत, मुख्यमंत्री पदावर आणि इतर महत्वाच्या पदावर दावा केला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास इतर पर्याय खुले असल्याचा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.
VIDEO | भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजू शकत नाही : उद्धव ठाकरे
संबंधित बातम्या