ठाणे : ठाण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका युवकाला बेदम मारून मग त्याला नग्न करून त्याचा व्हिडीओ बनवण्यात आला. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आला. या युवकाला इतके बेदम मारण्यात आले की, आठ दिवस तो घराच्या बाहेर देखील पडला नाही आणि पोलिसांत तक्रार देखील केली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहून ठाणे पोलिसांनी मारहाण झालेल्या मुलाचा शोध सुरु केला. अखेर श्रीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा युवक सापडला. त्याची चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटना सांगितली पोलिसांना सांगितली.


20 जून रोजी हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याच्या आठ दिवस आधी 12 जूनला ही घटना घडली. विकी भोसले नावाच्या कुख्यात गुंडाची दहशत कायम राहावी यासाठी त्याच्या साथीदारांनी या मुलाला मारहाण केली असल्याचे त्या मुलाने सांगितले. विकी भोसलेच्या विरोधात असलेल्या सागर रावल सोबत मारहाण झालेला युवक असायचा. त्याचा राग या मुलांनी काढला. हा मुलगा अठरा वर्षाचा असून त्याला सहा जणांनी मिळून मारले होते. त्यापैकी दोन जण हे अल्पवयीन आहेत.


सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झालाय त्यात एक युवक नग्नावस्थेत असून त्याला काही जण मारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मारणारी मुले पीडित मुलाला 'विकी भोसले बॉस आहे' हे जबरदस्तीने म्हणायला लावत आहेत. त्यासोबत त्याला बेदम मारहाणही करत आहेत. पोलिसांनी आता या प्रकरणांमध्ये दोघांना अटक केली आहे. या सर्व आरोपींवर कलम 307 नुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच इतर आरोपींचा शोध देखील घेतला जात आहे. विकी भोसले हा आधीपासूनच कुख्यात गुंड असून त्यावर साथ वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.


दरम्यान, मारहाण करणाऱ्या मुलांनी लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेतला. दुकाने बंद असल्याचे पाहून आणि रस्त्यावर वर्दळ नसल्याने या मुलाला प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच इतकी मारहाण होत असताना देखील कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. या प्रकरणातील इतर आरोपींना लवकरच शोधून जेरबंद करणार असल्याचं एसीपी प्रकाश निलेवाड यांनी सांगितले आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


लातूर जिल्ह्यात फादर्स डेच्या पूर्व संध्येला अन् आज मुलांकडून जन्मदात्या पित्याचा खून


बँकिंग व्यवहारांबद्दलच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ग्रामीणांना लुटणारी टोळी जेरबंद


नागपुरात उच्चभ्रू कॉलनीत जुगार, नगरसेवकासह आरोग्य कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त