नागपूर : कोरोना विरोधातल्या लढ्यात डॉक्टर, आरोग्य सेवेचे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांची भूमिका महत्वाची आहे. मात्र, हे सर्वच कायदा पायदळी तुडवत जुगार सारख्या बेकायदेशीर कृत्यात व्यस्त असल्याचं नागपुरात समोर आलं आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री अत्रे लेआऊट परिसरातल्या आनंदनगर या उच्चभ्रू कॉलोनीमध्ये जेव्हा धाड टाकली. तेव्हा एका बंगल्यात नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि विद्यमान नगरसेवक, शासकीय रुग्णालयातील एक वरिष्ठ डॉक्टर यांच्यासह आरोग्य सेवेतील काही कर्मचारी हे जुगार खेळताना आढळले. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात समाजाला ज्या वर्गाकडून मोठी अपेक्षा आहे. त्यापैकीच काही लोकं नियमबाह्य कामे करत असल्याचे उघड झाले आहे.


नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या पथकाला काल रात्री आनंदनगर भागात एका बंगल्यात अनेक लोकं जमा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जेव्हा चाचपणी केली. तर हे सर्व लोकं शहरातील विविध भागातून या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी एकत्रित आल्याचे उघड झाले. पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पथकाने जेव्हा आनंदनगर भागातल्या त्या बंगल्यावर धाड टाकली. तेव्हा आतमध्ये अनेक लोकं जुगार खेळताना आढळले. सुरुवातीला या सर्वांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयशी ठरल्यानंतर जुगार खेळणाऱ्या या बड्या मंडळींनी पोलिसांवर दबाव आणत जुगाराची कारवाई करू नये. प्रकरण दाबून टाकावे असे प्रयत्न केले.

मात्र, शासनाने रात्री नऊ नंतर पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असताना नागपुरातील विविध भागातून एवढे लोकं त्या ठिकाणी गोळा झाले होते. तसेच जुगारासारखे बेकायदेशीर कृत्य त्या ठिकाणी केले जात होते. त्यामुळे कोणत्याही दबावात न येता पोलिसांनी त्यांची कारवाई पूर्ण केली. पोलिसांनी त्या ठिकाणाहून हजारो रुपयांची रोकड, दहा मोबाईल, तीन कार, दोन बाईक्स याच्यासह एकूण 19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या नगरसेवकासह सरकारी डॉक्टर, आरोग्य सेवेतील कर्मचारी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.

गेल्या एका आठवड्यात नागपुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची ही तिसरी कारवाई आहे. या पूर्वी वेळा हरीश्चंद्र गावाजवळ एका ढाब्यावर जुगार खेळले जात असताना 11 जणांना पकडण्यात आले होते. तर गणेशपेठ हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये जुगार खेळणाऱ्या काही व्यापाऱ्यांना ही पोलिसांनी पकडले होते. त्यामुळे लॉकडाऊन मधील शिथिलता जरी उद्योग, व्यापार सुरु करून लोकांना त्यांचे रोजगार पुरवत करता यावे यासाठी देण्यात आली असली. तर समाजातील काही वर्ग या काळाचा वापर जुगार सारखे बेकायदेशीर कृत्यांसाठी करत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.