मुंबई : एकीकडे कोरोनाच्या सद्यस्थितीचा विचार करत तर मागील वर्षात अकरावी ऑनलाईन प्रवेश परीक्षेदरम्यान आलेले अनुभव आणि विद्यार्थी पालकांच्या तक्रारीनंतर या 2020-21 वर्षासाठीच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेतला असून त्यात काही बदल करण्यात आले आहेत. आता या प्रवेशप्रक्रियेदरम्यान काम अधिकाधिक ऑनलाईन कसा करता येईल, यावर भर देण्यात आला असून कमी कालावधीत ही प्रक्रिया राबवण्यावर विचार केला आहे.


यंदा जुलै अखेरीस दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दीड महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. करोनाचा प्रादुर्भाव, लांबलेले शैक्षणिक वर्ष यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशाससाठी दरवर्षी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजना प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्यांनुसार फेऱ्या होणार आहेत. मात्र नियमित फेऱ्या पार पडल्यानंतर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य'या फेरीचे नियोजन केले जाते. मात्र यंदा ही फेरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी गरज भासल्यास विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल, असं प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर कमीत कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल असे नियोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.


प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे यापासून ते प्रवेश शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्या अनुषंगाने प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन अर्जात अपलोड करता येणार आहेत. मुंबई महानगर परिक्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.


दरवर्षी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या कॉलेजच्या प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्या, त्यानंतर रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावरील फेऱ्या आणि यानंतरही राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेऱ्या, असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप असते. जूनमध्ये सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया वाढणाऱ्या प्रवेश फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारी यामुळे अगदी ऑक्टोबरपर्यंत लांबते. त्यामुळे यंदाच्या वर्षी ही प्रक्रिया राबवण्यास वेळ कमी असल्याने हे निर्णय घेण्यात आले आहेत.


आरक्षणातील बदल व इतर महत्वाचे मुद्दे
- मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) 16 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.
- यंदा शासन निर्णयानुसार हे प्रमाण 12 टक्के करण्यात आले.
- अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे.


प्रवेश फेऱ्यांचे स्वरुप
- द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील
- नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील.
- विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील
- नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील
- मुंबई आणि पुणे महापालिकेच्या ज्युनिअर कॉलेजांतील 50 टक्के जागा या पालिकेच्या शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत.