मुंबई : आज 12 मे, जागतिक परिचारिका दिन. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. कोरोना संकटकाळात परिचारिका कोरोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. त्याचसोबत महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच, 1 मे पासून 15 मे पर्यंतचा हा पंधरवडा म्हणजे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' म्हणून ओळखला जातो. हेच औचित्य साधत विविध पोर्ट्रेट साकारून तब्बल 14 विश्वविक्रम करणारे कलाकार चेतन राऊत यांनी आणखी एक पोर्ट्रेट साकारले आहे.


महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. परंतु या संकटात देखील अत्यावश्यक सेवेतील सर्वच कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आरलं कर्तव्य बजावत आहेत. मग ते रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण बरे करणारे डॉक्टर्स, नर्स असो किंवा रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून अक्षरशः 24 तास बंदोबस्ताला उभे असणारे पोलीस असो किंवा या संकट काळातही समाजाला योग्य माहिती देणारे पत्रकार. या साऱ्यांचेच कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच या रियल हिरोच्या कार्याला गौरवण्यासाठी विविध पोर्ट्रेट साकारून तब्बल 14 विश्वविक्रम करणारे कलाकार चेतन राऊत यांनी आणखी एक पोर्ट्रेट साकारले आहे.


चेतन राऊत यांनी कोरोना योद्ध्यांचे मोझेक पोर्ट्रेटच्या माध्यमातून चित्र साकारले आहे. यात 6 रंगछटा असलेल्या 32 हजार पुश पिनचा वापर केला आहे. हे पोर्ट्रेट 4 बाय 6 फूट लांबीचे असून हे तयार करण्यासाठी चेतन राऊत यांच्यासोबत सिद्धेश रबसे, मयूर अंधेर आणि 4 वर्षांचा बाल कलाकार आयुष कांबळे यानेही साथ दिली आहे. आणि अवघ्या 48 तासांत हे चित्र त्यांनी पूर्ण केलं आहे. सध्या लॉकडाऊन मुळे हे पोर्ट्रेट पवई मधील चेतन यांच्या राहत्या घरीच तयार केले आहे.


... म्हणून जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो.


रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण जगात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


BLOG : आरोग्य विभागाच्या वाढत्या जबाबदारीचा परिचारिकांचा कामावर अतिरिक्त तणाव