>> प्रा. डॉ. आनंद आंबेकर


आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये परिचारिकांचा खूप मोठा आदर आणि सन्मान केला जात आहे. कारणही तसेच आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमध्ये जगाला कळून चुकले आहे की, वैद्यकीय क्षेत्रामध्ये परिचारिका हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, म्हणूनच वैद्यकीय क्षेत्राचा कणा म्हणून परिचारिकांकडे पाहिले जात आहे. परंतु, मी जेव्हा 2011 साली "रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिकांची भूमिका" या विषयावर पीएचडीसाठी अध्ययन करण्यास सुरुवात केली. तेव्हा अनेक लोकांनी हा असा विषय अध्ययनाचा असू शकतो का? असा प्रश्न केला. परंतु, माझ्या पीएचडीच्या पायलट प्रोजेक्टमध्ये अध्ययन करताना अनेक प्रश्न तयार करत होतो. अशावेळी व्यावसायिक प्रश्नांमध्ये तीन महत्त्वाचे प्रश्न सध्याच्या काळात आणि नऊ वर्षापूर्वी माझ्या अध्ययनाच्या काळात सुद्धा महत्त्वाचे होते. त्याबद्दल आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे.
   
प्रथमतः सहकारी परिचारिका यांच्याशी काम करत असताना येणाऱ्या प्रश्नांसंदर्भात वैचारिक मतभेद असा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये 58% परिचारिकांना प्रश्न निर्माण होतात तर सुट्टी अॅडजेस्टमेंट करण्यासंदर्भात 42% पर्यंत प्रश्न निर्माण होतात, असे मुलाखत घेत असताना माझ्या निदर्शनास आले. दुसरा घटक म्हणजे चतुर्थश्रेणी कामगार यांच्याशी प्रश्न निर्माण होत असताना व्यवसायिक कामचुकारपणा करण्यासंदर्भात परिचारिकांना 34% समस्या निर्माण होतात. तसेच सूचनांचे पालन न करण्यासंदर्भात 44% समस्या निर्माण होताना दिसतात असे संशोधनातून समजते. तिसरा घटक वैद्यकीय अधिकारी यांच्या सूचना मधील अस्पष्टता 60 टक्के परिचारिकांना हा प्रश्न निर्माण झालेला दिसतो तर अधिकाराचा दबाव येणाऱ्या परिचारिकांमध्ये 22 टक्के परिचारिका होत्या.


वरील माझ्या पीएचडीच्या संशोधनातून नऊ वर्षांपूर्वी मुलाखतीद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील 150 परिचारिकांशी चर्चा करून मुलाखत घेतल्यानंतर लक्षात आले होते, आज कोरोना काळामध्ये हेच व्यावसायिक प्रश्न निर्माण झालेले दिसतात. आज आपल्या सामान्य लोकांमधील रुग्ण 24 तास ज्यांच्या नेतृत्वाखाली सतत सहवासात असतो अशा परिचारिकांना हे प्रश्न आजही निर्माण होताना दिसतात. याचे प्रमुख कारण सहकारी परिचारिकांनी मधले प्रश्न हे केवळ परीचाकांची संख्या कमी असल्यामुळे दिसतात तर चतुर्थ श्रेणी कामगारांमधील जाणीव जागृती यामुळे प्रश्न निर्माण झालेले दिसतात तर वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील कोरोना संदर्भामध्ये असणारी माहिती अजूनही अस्पष्ट असल्यामुळे परिचारिकांना कोणत्या सूचना द्याव्यात यामुळे आज प्रश्न निर्माण झालेले दिसतात.


रुग्णालये रुग्णांसाठी तयार झालेले असते आणि रुग्ण परिचर्येसाठी परिचारिका असतात. परिचारिकांना रुग्णसेवा करत असताना अनेक वेगवेगळे प्रसंग येत असतात आणि अनेक वेळेला परिचारिका खूपच कठीण शब्दात रागाने बोलत असताना दिसतात आणि असाच अनुभव रुग्ण नातेवाईकांसोबत सुद्धा येतो. परंतु, असं का होतं? असा आपण कधीच विचार करत नाही. रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्यांना विश्रांती आवश्यक असते. परंतु, आपण काहीही विचार न करता रुग्णांना बघण्यासाठी आपलं कर्तव्य पार पडण्यासाठी भेटायला जात असतो. अगदी आयसीयूमध्ये असला रुग्ण असला तरी, त्याला बघण्याचा आग्रह करतो. परंतु, रुग्ण सेवा करताना परिचारिकांच्या कर्तव्यामध्ये आपण नेहमीच अडचण आणत असतो.
     
"रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिकांची भूमिका" या विषयावर मी पीएचडी करत असताना या संदर्भात मुलाखतदार परिचारिकाना प्रश्न विचारला होता. रुग्ण संदर्भात समस्या कोणत्या येतात, औषधोपचाराला सहकार्य करतात का? सूचना पालन करणे आणि स्वच्छता यासंदर्भात हे प्रश्न होते.
      
रूग्ण आणि परिचारिका यांच्यातील संबंध चांगले असणे गरजेचे आहे. कारण यावरच रुग्णाचे आरोग्य अवलंबून असते. परिचारिकांना यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर औषधोपचाराला 32 टक्के रुग्ण प्रतिसाद देत नाहीत तर आरोग्य सूचनांचे पालन जवळजवळ 42 टक्के रुग्ण करत नाहीत आणि स्वच्छतेबाबत 36 टक्के रुग्ण प्रतिसाद देत नाहीत. या त्यांच्या असहकार्यामुळे बऱ्याचवेळेला रुग्णाच्या बरे होण्याच्या टक्केवारीवर परिणाम होत असतो.


दुसरा भाग असा कि रुग्णाच्या नातेवाईकांकडून परिचारिकांना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. नातेवाईक कामामध्ये हस्तक्षेप करतात का? सामाजिक किंवा राजकीय दबाव आणतात का? असे प्रश्न विचारले होते. आज कोरोना काळामध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यासाठी जबरदस्त संघर्ष करावा लागत आहे. याचे मूळ कारण आपण आरोग्य विभागाकडून आलेल्या सूचनांचे पालन करत नाही. माझ्या अभ्यासामध्ये असे प्रश्न विचारल्यानंतर 39 टक्के लोक परिचारिकांच्या कामात हस्तक्षेप करताना दिसत होते. राजकीय आणि सामाजिक दबाव आणणाऱ्यांमध्ये 45 टक्के रुग्ण होते. परंतु, अश्याप्रकारे प्रशासकीय दबाव आणण्यासाठी परिणाम आपल्या रुग्णांना भोगावा लागत आहे. 


परिचारिका प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून मोठ्या अपेक्षा
परिचारिका या शासकीय रुग्णालयातील असो किंवा खाजगी रुग्णालयातील असो. परंतु, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज कोरोना काळामध्ये आपण परिचारिकांना खूपच मोठ्या प्रमाणावर आदराचे स्थान देत आहोत. परंतु, वर्षोनुवर्षे परिचारिकांच्या समस्यांकडे कोणीच पाहत नव्हते. सुदैवाने माझ्या पीएचडीच्या अध्ययनामध्ये काम करत असताना मला पूर्णपणे जाणीव होती की, मला समाजातील अशा घटकाचे अध्ययन करायचे आहे की तो घटक म्हणजे "परिचारिका" आपल्या सर्वच व्यक्तींच्या संदर्भात येत असतो. आपण रुग्ण असलो तर संबंध येतो रुग्ण नसलो तरीसुद्धा आपण आपल्या आप्त किंवा नातेवाईकांसाठी त्यांचा संबंध येतो.


परिचारिकांना कोणत्या समस्या येतात यावर मी काही प्रश्न तयार केले. दीडशे परिचारिकांची मुलाखत घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी माझ्या समोर मांडला तो म्हणजे बदली होण्याचा शासकीय नियम असल्यामुळे कौटुंबिक आणि वैयक्तिक दुरावस्था होणाऱ्या 82 टक्के परिचारिका होत्या. परिचारिकांवर कौटुंबिक आणि मानसिक परिणाम होत होता. दुसरा प्रश्न परिचर्या करत असताना परिचारिकांचा आणि रुग्णांचा एक स्टँडर्ड रेशो असतो. परंतु, शासकीय रुग्णालयांमध्ये दुर्लक्षित असणारा परिचारिका घटक असल्यामुळे परिचारिकांची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे प्रश्न निर्माण होत असताना वॉर्डमध्ये रुग्णांसाठी जागा नस.ते त्याच पटीनं सहकार्य करणारे चतुर्थश्रेणी कामगार नसतात. अशा अनेक प्रश्नावर पूर्णपणे प्रशासकीय पातळीवर कार्यवाही अमलात आणण्यासाठी सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे आहे.


सहाजिकच परिचारिकांचे आरोग्य चांगले असेल तरच रुग्णांचे आरोग्य चांगले असू शकते. या प्रश्नांमध्ये परिचारिकांना विचारलं, कामाचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही काय करता? त्यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते. कारण 24 तास रुग्णांची सेवा केल्यानंतर त्यांना असा आयडीयली वेळच नसतो कि, आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतात. परंतु, तरीही माझ्या पीएचडी अध्ययनानंतर आरोग्यासाठी वैयक्तिक पातळीवर त्यांनी प्रयत्न केलेच पाहिजे असे सजेशन दिले आहे. परंतु, प्रशासकीय पातळीवर शासन दरबारी परिचारिकांच्या बदलीचा प्रश्न आणि परिचारिका संख्येचा प्रश्न हा खूप मोठा आहे. या प्रश्नावर आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. तरच परिचारिकांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात.