मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे दोन ऑक्सिजन प्लांट सध्या कार्यरत असून आणखी 12 ठिकाणी महापालिकेद्वारे ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती निविदा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने, स्पर्धात्मकरित्या व नियमानुसारच राबवण्यात आली आहे. तथापि, या अनुषंगाने आज काही माध्यमातून व समाज माध्यमातून काही आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या खर्चापेक्षा कमी खर्चात इतर महापालिकांद्वारे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तथापि, ऑक्सिजन प्लांटची निर्मिती क्षमता लक्षात न घेता करण्यात आलेले आरोप बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे फेटाळण्यात येत आहेत. 


ऑक्सिजन प्लांट किंवा इतर यंत्र प्रणालीचे दर व एकंदर खर्च हे त्याची निर्मिती क्षमता, निर्मिती करण्याच्या प्रकार, तांत्रिक बाबी, कामाची व्याप्ती व प्रमाण, अधिदानाच्या‌ व अटी व शर्ती (payment conditions), पुरवठा कालावधी (Delivery Period) इत्यादी बाबींवर अवलंबून ‌असतो, त्यामुळे तौलानिक अभ्यास करताना या बाबी लक्षात घेणे, अत्यंत गरजेचे आहे. 


त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे 12 ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची एकूण क्षमता ही 45 मेट्रिक टन प्रतिदिन एवढी आहे. तर इतर महापालिकांच्या 'ऑक्सिजन प्लांट'ची क्षमता यापेक्षा कमी आहे.


Mission Oxygen : मुंबईतील मिशन ऑक्सिजनमध्ये भ्रष्टाचार; भाजपचा आरोप


'कोविड 19' या संसर्गजन्य रोगाने बाधित झालेल्या रुग्णांची प्राणवायूची पातळी झपाट्याने खाली घसरते. अशा वेळी या रुग्णांना यांत्रिक पद्धतीने ऑक्सिजन देण्याची गरज असते. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये प्राणवायूची कमतरता भासू नये, या दृष्टीने महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयांमध्ये सध्या ऑक्सिजन प्लांट कार्यरत आहेत.‌ तर याव्यतिरिक्त आणखी 12 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यानुसार ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या निविदा प्रक्रियेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.


भाजपने काय आरोप केलेत?


मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच शहर उपनगरात ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. ही निविदा प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या पारदर्शी नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणीमध्ये वसई-विरार महानगर पालिकेने मागवलेल्या दरापेक्षा मुंबई महापालिका दुप्पट दराने याची उभारणी करत असल्याची बाब निदर्शनास आणून देत या प्रकल्पात भ्रष्टाचार होण्याची शक्यता भाजपचे मुबई महापालिकेचे पक्षनेता विनोद मिश्रा यांनी वर्तवली आहे. त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.