एक्स्प्लोर
नवी मुंबई दात काढताना 55 वर्षीय महिलेचा मृत्यू

नवी मुंबई : कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात दातांवर उपचार करताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शिकाऊ डॉक्टरने दात काढताना झालेल्या कथित चुकीमुळे 55 वर्षीय पुष्पा पांडे या महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा दावा केला जात आहे. रुग्णालयाने मात्र नातेवाईकांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. मुलीकडे लग्न समारंभासाठी आलेल्या पुष्पा पांडे यांच्यावर कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात (एमजीएम) दंतोपचार सुरु होते. यावेळी शिकाऊ डॉक्टरकडून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र कळा येत असल्याचे पुष्पा पांडे यांनी डॉक्टरांना सांगूनही त्यांनी दात काढला होता. याच दरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला. कळा असह्य होऊन त्यांचा मृत्यू ओढवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पांडे यांच्या नातेवाईकांचे आरोप रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी मात्र फेटाळून लावले आहेत. पुष्पा यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर कोणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























