राज्यातील लॉकडाऊन वाढणार? कोणत्या विषयांवर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता?
राज्यात लसीचा तुटवडा आहे त्यामुळे दुसरा डोस ज्यांना द्यायचा आहे त्यांना डोस मिळत नाही. त्यामुळे 18 ते 44 मधील लसी 45 वरील दुसऱ्या डोससाठी वळवणार आहे. याबाबत आज निर्णय अपेक्षित आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडणार आहे. आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण राज्यात लॉकडाऊन वाढणार की नाही वाढणार? लॉकडाऊन वाढला तर किती दिवस वाढणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मिळणार आहेत. सध्यातरी राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ बैठक इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. यावर एक नजर टाकूया.
अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाची स्थिती सुधारत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवलं तर ते सरसकट वाढवणार की मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणी कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे तिथे काही सूट नागरिकांना दिली जाऊ शकते का, हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर कळेल.
महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन
तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार ऑक्सिसन स्वयंपूर्ण व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी मिशन ऑक्सिजन मोहीम सुरू केली आहे. त्याला आज बैठकीत मंजुरी मिळू शकते. यासाठी 1100 कोटींची तरतूद सरकार करण्याची शक्यता आहे.
सध्या महाराष्ट्रत 1800 मेट्रिक टनची आवश्यकता असून यापैकी 1295 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती महाराष्ट्रात होत असून सुमारे 500 मेट्रिक टन आपणास इतर राज्य व केंद्र शासनाच्या मदतीन उपलब्ध होत आहे. सद्यस्थितीत असलेल्या 38 PSA प्लांटस मार्गात 53 मेट्रिक टनची निर्मिती होत आहे. तसेच अल्पकाळातील आवश्यकतेचा विचार करता, महाराष्ट्र स्वावलंबी होण्यासाठी राज्यात सुमारे 382 अतिरिक्त PSA प्लांटसची स्थापना करण्यात येत आहे व त्यातून जवळपास 240 मेट्रिक टनची निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असून सर्व प्लांट्स जून अखेरील सक्रिय होतील. या उपक्रमामुळे राज्यातील हॉस्पिटल्स ऑक्सिजनबाबत स्वावलंबी होतील. रुग्णालयांमध्ये पुरेशी ऑक्सिजन क्षमता देण्याच्या उद्देशाने पूर्वतयारी म्हणून शासन अन्य योजनांचाही विचार करीत आहे. याशिवाय 'ऑक्सिजन ऑन व्हील्स' सारख्या प्रारुपंचा ही शासन विचार करीत आहे ज्यामुळे रूग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचू शकेल.
लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय
राज्यात लसीचा तुटवडा आहे त्यामुळे दुसरा डोस ज्यांना द्यायचा आहे त्यांना डोस मिळत नाही. त्यामुळे 18 ते 44 मधील लसी 45 वरील दुसऱ्या डोससाठी वळवणार आहे. याबाबत आज निर्णय अपेक्षित आहे.
पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' घोषित करणार?
पत्रकारांचं लसीकरण व्हावे अशी मागणी अनेक मंत्र्यांनी केली आहे, यावर देखील चर्चा होऊ शकते. पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. इतर राज्यात देखील पत्रकारांना असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून घोषित करावे, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती.