(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई मनपा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार?
राष्ट्रवादीला मुंबईत महाविकास आघाडी हवीशी वाटत असली तरी कॉंग्रेसला मात्र ती फारशी रुचणार नाही. महाविकास आघाडीने भाजपला मुंबईतून संपवण्याचा चंग बांधला तर भाजपलाही ते चांगलंच महागात पडेल.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीची वर्षपूर्ती होण्याच्या आतच महापालिका स्तरावरही महाविकास आघाडीची तीन चाकांची गाडी पळणार का याची चर्चा सुरु झाली आहे. 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणूका आहेत आणि या निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्वातली महाविकास आघाडी मुंबईत सत्तेत येईल असं भाकीतही शिवसेनेच्या संजय राऊतांनी केलं आहे. पण, राज्यातलं महाविकास आघाडीचं हे समीकरण महापालिका स्तरावर सत्यात उतरणं कितपत शक्य आहे?
संजय राऊतांनी हे विधान केलं आणि महाविकास आघाडीचं लोणचं आता चांगलंच मुरायला लागलंय याचे संकेत दिले. राज्यासाठी महाविकास आघाडीचं समीकरण नवीनचं असून याची वर्षपूर्तीही आता कुठे होणार आहे. पण, राज्यात जुळलेलं हे समीकरण मुंबई महापालिकेत जुळेल का आणि महाविकास आघाडीची गाडी महापालिकेतही धावेल का यावर आता तर्क लढवले जात आहे. एकीकडे राऊत छातीठोकपणे ही गाडी मुंबईत धावेल असं म्हणत आहेत पण दुसरीकडे महाविकास आघाडीतली शिवसेनेसोबतची दोन चाकं मात्र सध्यातरी दोन वेगवेगळ्या रस्त्यांच्या दिशा दाखवत आहे
गेल्या निवडणुकीत मुंबईत शिवसेना प्रथम क्रमांकावर होती. पण, पाठीला पाठ लावून भाजपनंही दुसरा क्रमांक पटकवला आणि अनेक वर्षे शिवसेनेनंतर मुंबईत बळकट असणारी कॉंग्रेस मुंबईत तीस-या क्रमांकावर गेली आहे. आता पूर्वीचं स्थान परत हवं असेल कॉंग्रेसला भाजपसोबतच शिवसेनेशी टक्कर घेणंही भाग आहे.
मुंबईतील राजकीय समीकरण :
शिवसेना
नगरसेवक : 97 सर्व महत्वाच्या समित्यांवर शिवसेनेचं अध्यक्षपद मुंबईतला मराठी माणूस हा हक्काचा मतदार
भाजप
नगरसेवक : 83 दुस-या क्रमांकाचा पक्ष 2017 च्या निवडणुकीत घेतलेली पहारेकरीची भूमीका मुंबईतली बहुतांश गुजराती व्होट बॅक भाजपची
कॉंग्रेस
नगरसेवक : 29 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या लाटेनं मागे फेकला गेला. विरोधी पक्षाची भूमीका बहुतांश परप्रांतीय व्होट बॅक कॉंग्रेसची
राष्ट्रवादी कॉंग्रेस
नगरसेवक : 8 मुंबईत कॉंग्रेसच्या सहाय्यानं वाढणारा पक्ष मात्र, मुंबईत स्वत:चं बळ फारसं नाही.
त्यामुळे वरवर पाहता महाविकास आघाडीचं समीकरण राज्यात परवडणारं असलं तरी मुंबई महापालिकेत ते विशेषत: कॉंग्रेसला अडचणीत आणणारं आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला मुंबईत महाविकास आघाडी हवीशी वाटत असली तरी कॉंग्रेसला मात्र ती फारशी रुचणार नाही.पण, सेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तिनही पक्षांनी मिळून भाजपला मुंबईतून संपवण्याचा चंग बांधला तर भाजपलाही ते चांगलंच महागात पडेल.
मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या हातात असणं हे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. गेली 25 वर्षे या चाव्या शिवसेनेच्या हातात आहेत. गेल्या निवडणुकीत या चाव्यांना भाजपनंही निसटता स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. पण येत्या निवडणूकीत या या चाव्या हस्तगत करण्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधली जातेय की आणखी नवी समीकरणं आकारला येत आहेत हे येणार काळचं सांगेल.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई ही महानगरी कायम केंद्रबिंदु राहिली आहे. कारण ज्याच्या हाती मुंबईची दोरी तोच राज्यातही कारभारी... त्यामुळे, मुंबई हातात मिळवण्यासाठी नवनवी राजकीय समिकरणं मांडली जाणारचं. पण, या समीकरणांनी राजकीय पक्षांसोबतच मुंबईचंही भवितव्य बदलावं हीच अपेक्षा.
संबंधित बातम्या :