मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीची सुई सध्या एका कथित सेलिब्रिटी पार्टी भोवती फिरते. कारण भाजपच्या गोटातून या कथित पार्टी संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजप नेत्यांकडून सोशल मीडियावर आणि सरकारला पत्र लिहून सुशांतच्या आत्महत्येपूर्वी झालेल्या या कथित पार्टीचा काय संबंध आहे याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष करून मुंबई पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, अशीही शंका भाजपकडून उपस्थित केली जात आहे.


भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे लॉकडाऊनच्या काळात अशा कथित सेलिब्रिटी पार्ट्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू होत्या असा सवाल केला आहे आणि पुन्हा एकदा सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार अमित साटम यांनी झोन 9 चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांना पत्र लिहून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित त्या विविध प्रश्नांचा उलगडा करण्याची मागणी केली आहे जे अजून चौकशीतून स्पष्ट झालेले नाहीत.


त्यात प्रामुख्याने दिशा सालियान आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही तार्किक संबंध आहे का, सुशांतच्या आत्महत्येपूर्वी 13 जूनला कुठली सेलिब्रिटी पार्टी झाली होती का, ती कुठे झाली होती, त्या पार्टीत कोण-कोण उपस्थित होतं. दिशाच्या आत्महत्येपूर्वीच्या 24 तासात तिचे कॉल रेकॉर्ड चेक करण्यात आले का, 8 ते 14 जून दरम्यान सुशांतने वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर केला होता का, सुशांतला कोणाकडून धमकावण्यात आले होते का. तसेच सुशांतच्या बहिणीचा, शेजाऱ्यांचा, मित्र संदीप सिंग, महेश शेट्टी आणि मॅनेजर सिद्धार्थ पिठाणी यांच्या जबाबाबाबत अनेक प्रश्न या पत्राद्वारे विचारण्यात आले आहेत.


विशेषतः भाजप या मागणीद्वारे मुंबई पोलीस या प्रकरणात सरकारमधल्या कुठल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का अशी शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या कथित पार्टीचं गुढ निर्माण करून सरकारला धारेवर धरण्यासाठी येत्या काळात भाजप आणखी आक्रमक होण्याचे संकेत मिळत आहेत.


संबंधित बातम्या




रिया चक्रवर्तीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सुशांतच्या वडिलांचा आरोप