Mumbai Local : पश्चिम रेल्वे लोकलचं वेळापत्रक बदलणार, 12 फेऱ्या नव्यानं सुरु होणार,'या' तारखेपासून अंमलबजावणी
Western Railway : पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेचं म्हणजेच लोकलचं नवं वेळापत्रक जाहीर करणार आहे. सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांमध्ये 12 फेऱ्यांची वाढ होणार आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकलद्वारे मधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेकडून उपनगरीय सेवेचं नवं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. या वेळापत्रकाची अंमलबजावणी 12 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पश्चिम रेल्वेनं नव्या वेळापत्रकात 12 नव्या फेऱ्यांचा समावेश केला आहे. यामध्ये सध्या सुरु असलेल्या सहा फेऱ्यांना पुढं सुरु ठेवण्यात आलं आहे. तर, 10 लोकलचं अपडेशन करण्यात येणार असून त्या 12 डब्यांऐवजी 15 डब्यांसह धावतील. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पश्चिम रेल्वेवर सुरु असणाऱ्या लोकलच्या फेऱ्यांची संख्या 1394 वरुन 1406 पर्यंत वाढणार आहे.
विरार ते चर्चगेट अशी एक फास्ट लोकल नव्यानं सुरु करण्यात येईल. तर, डहाणू रोड ते विरारपर्यंत दोन स्लो लोकल चालवल्या जातील. अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली येथून चर्चगेटसाठी एक स्लोट लोकल सुरु करण्यात येईल. चर्चगेट ते नालासोपारा पर्यंत एक फास्ट लोकल सुरु होईल. चर्चगेट ते गोरेगाव अशा दोन स्लो लोकल चालवल्या जातील. याशिवाय चर्चगेटपासून अंधेरीपर्यंत एक स्लो लोकल चालवली जाईल. विरार ते डहाणू रोड पर्यंत दोन धिम्या लोकल चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकापर्यंत सहाव्या मार्गिकेचं काम सुरु आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम रेल्वेनं या कामाला गती देण्यासाठी मेजर ब्लॉक देखील घेतला होता. सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण करण्यासाठी राम मंदिर ते मालाड स्थानकादरम्यान लोकलचा वेग 30 किमी प्रतितास करण्यात आला आहे. यामुळं पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर होत असून 4 ऑक्टोबरपर्यंत दररोज 150 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
नवं वेळापत्रक 12 ऑक्टोबरपासून सुरु होणार
पश्चिम रेल्वेवर मालाड स्थानकापर्यंत सहावी मार्गिका उभारणीचं काम पूर्ण झाल्यानंतर लोकलचा वेग पूर्ववत होईल. पश्चिम रेल्वे नवं वेळापत्रक 12 ऑक्टोबरपासून लागू करणार आहे. त्यामध्ये 12 फेऱ्या नव्यानं सुरु करण्यात येणार आहेत. गोरेगाव ते कांदिवली पर्यंत सहावी मार्गिका उभारण्याचं काम पश्चिम रेल्वेनं हाती घेतलं आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल सेवेमध्ये सुधारणा होणार आहे.
इतर बातम्या :
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा